ST Strike: फलटण एसटी आगाराची गाडी रुळावर, सर्व कर्मचारी झाले रुजू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 01:52 PM2022-04-23T13:52:17+5:302022-04-23T13:52:59+5:30

एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यापासून आंदोलन पुकारले होते. यामुळे एसटीची चाके पूर्णपणे ठप्प झाली होती.

All the employees of Phaltan ST Depot joined | ST Strike: फलटण एसटी आगाराची गाडी रुळावर, सर्व कर्मचारी झाले रुजू

ST Strike: फलटण एसटी आगाराची गाडी रुळावर, सर्व कर्मचारी झाले रुजू

googlenewsNext

फलटण - फलटण एसटी आगारातील शंभर टक्के कर्मचारी कामावर हजर झाले असून, एसटीच्या ७६ फेऱ्या सुरू झाल्याने फलटण एसटी आगाराची गाडी रुळावर लागली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यापासून आंदोलन पुकारले होते. यामुळे एसटीची चाके पूर्णपणे ठप्प झाली होती. फलटण एसटी आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्याने बाहेरील आगारातील गाड्यांवर प्रवाशांना अवलंबून रहावे लागत होते. खासगी प्रवासी वाहतुकीने थोडाफार आधार प्रवाशांना दिला. मधल्या काळात हळूहळू इतर आगारातील कर्मचारी कामावर रुजू झाले होते. मात्र, फलटण आगारात तुरळक कर्मचारीच कामावर हजर झाल्याने फलटण एसटी आगाराचे कामकाज तसे ठप्पच होते.

फलटण आगाराने लांब पल्ल्याच्या गाड्या बरोबरच ग्रामीण भागातील गाड्या पण सुरू झाल्याने प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

आगारातील ४५० कर्मचारी हजर

विलीनीकरणाची मागणी शासनाने फेटाळली तसेच न्यायालयाने २२ एप्रिल पर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्याने विलीनीकरणाची मागणी मागे टाकत फलटण आगारातील कर्मचारी कामावर हजर झाले असून,आज अखेर १८२ चालक, १६७ वाहक, ५५ कार्यशाळा कर्मचारी, ४६ प्रशासकीय कर्मचारी हजर झाले असून एसटीच्या एकूण ७६ फेऱ्या सुरू झाल्याने एसटी आगार सुरळीत झाले आहे.

आगारात डांबरीकरणाची आवश्यकता

फलटण एसटी आगारातील रस्ता डांबरीकरणासाठी मध्यंतरी पूर्णपणे उकरून काढला असून बरेच महिने रस्ता तसाच राहिल्याने बस आल्यास मोठा धुरळा उडत आहे. खड्ड्यांचा त्रास होण्याबरोबरच प्लेटफॉर्मची उंची रस्ता खोदल्यामुळे जास्त झाल्याने वयस्कर माणसे महिला यांना बसमध्ये चढणे उतरणे अवघड होत आहे. डांबरीकरण त्वरित करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

Web Title: All the employees of Phaltan ST Depot joined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.