दुचाकीला कट मारल्याचा वाद ‘हाफमर्डर’वर पोहोचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:44 AM2021-09-21T04:44:38+5:302021-09-21T04:44:38+5:30
सातारा : रस्त्यांमध्ये अनेकदा आपण वाहनचालकांमधील बाचाबाचीचे गंभीर वादामध्ये रूपांतर झाल्याचे पाहात असतो. असाच काहीसा प्रकार सातारा तालुक्यातील आसगाव ...
सातारा : रस्त्यांमध्ये अनेकदा आपण वाहनचालकांमधील बाचाबाचीचे गंभीर वादामध्ये रूपांतर झाल्याचे पाहात असतो. असाच काहीसा प्रकार सातारा तालुक्यातील आसगाव येथे दि. १८ रोजी रात्री आठ वाजता घडलाय. दुचाकीला कट मारल्यानंतर झालेल्या वादातून एका युवकाने दुसऱ्या युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दीपक चंद्रकांत शिंदे (रा. आसगाव, ता. सातारा) व विशाल शिंदे यांच्या दुचाकीला साईराज शिंदे (रा. आसगाव) हा कट मारून निघून गेला. या कारणावरून भैरोबा मंदिर चाैकात त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर साईराज शिंदे याने विशाल शिंदे याला धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास दीपक शिंदे यांच्या घरासमोर येऊन अक्षय साबळे (रा. वडूथ, ता. सातारा) याने गणेश शिंदे याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने गणेश शिंदे याच्यावर वार केले. हे वार डावा हात, मनगट, दंडावर, खांद्यावर, पाठीवर करण्यात आले आहेत. यामध्ये गणेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर दीपक शिंदे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी साईराज अशोक शिंदे (रा. आसगाव, ता. सातारा), अक्षय पोपट साबळे (रा. वडूथ, ता. सातारा) याच्यासह एका अनोळखीवर ३०७ कलमान्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या वादावादीनंतर सहायक पोलीस अधीक्षक ऑचल दलाल यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलीस उपनिरीक्षक दळवी हे अधिक तपास करत आहेत.