ज्यांचे व्यवसायाच टक्केवारीवर चालतात त्यांचे आरोप हास्यास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:40+5:302021-03-13T05:12:40+5:30

नगरसेवक पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जनशक्ती आघाडीच्या राजेंद्र यादव यांनी ...

The allegations of those whose businesses run on percentage are ridiculous | ज्यांचे व्यवसायाच टक्केवारीवर चालतात त्यांचे आरोप हास्यास्पद

ज्यांचे व्यवसायाच टक्केवारीवर चालतात त्यांचे आरोप हास्यास्पद

Next

नगरसेवक पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जनशक्ती आघाडीच्या राजेंद्र यादव यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पावसकर व नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यावर टक्केवारीचा आरोप केला होता; त्या संदर्भात भाजपाने पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी नगरसेवक पावसकर बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरसेवक सुहास जगताप, फारूक पटवेकर, नगरसेविका विद्या पावसकर उपस्थित होते.

पावसकर म्हणाले, ‘राजेंद्र यादव यांची राजकीय कारकीर्दच फसवेगिरीतून उभी राहिली आहे. माजी नगरसेवक निवास पोळ यांच्या मृत्यू झाल्यानंतर पोटनिवडणुकीतून राजेंद्र यादव यांना निवडून आणण्यासाठी मी आणि माझे सहकारी त्यावेळी प्रयत्नशील होतो. निवडून आल्यावर आमचा हार त्यांनी स्वीकारला आणि आम्हाला फसवत ते त्यावेळच्या विरोधकांबरोबर गेले यातून त्यांची नीतिमत्ता दिसून येते. आता ते आमच्याबद्दल तत्त्वाच्या गोष्टी बोलतात.’

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याचा चेहरा वापरून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांनाही त्यानंतर फसवले गेले. यावरून यांची नीतिमत्ता कळते. आमच्या नीतिमत्तेवर बोलण्याचा त्यांना अधिकारच काय? त्यांचं आमदारकीचं स्वप्न अपूर्ण राहिलंय त्यामुळे ते शहराला त्रास देत आहेत. जिल्ह्यात आमदार, खासदार, पालकमंत्री आहेत त्यांना शहराची नक्कीच काळजी आहे. त्यांना डावलून हे स्मार्ट सिटी करण्याची भाषा करत आहेत. ज्यांना आपला वॉर्ड नीट करता आला नाही ते स्मार्ट सिटीची भाषा करत आहेत. हे विसंगत नाही का? ते स्वतःला जनशक्ती आघाडीचे गटनेते म्हणवून घेतात. त्या आघाडीचे नेते अरुण जाधव आहेत त्यांना तरी कधी त्यांनी विश्वासात घेतले का? नुसतं नाव त्यांचे घ्यायचे आणि पालिकेत बोर्डावर यशवंत आघाडीचे गटनेते असे लिहायचे हे लोकांना कळत नाही का? निवडणुका आल्या की, गावात यायचं आणि निर्धार मेळावे घ्यायचे हे यांचे धंदे लोकांना माहीत आहेत. त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, असेही पावसकर म्हणाले.

चौकट

मग यांच्या पोटात का दुखतंय ...

आम्ही सोमवार पेठेत सीसीटीव्ही बसवले, त्यात त्यांच्या पोटात काय दुखतंय? असा सवाल करत पावसकर म्हणाले, ‘चोर, दरोडेखोर यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असे कॅमेरे असतात, पण या गोष्टीचे विरोधकांना वावडं काय वाटतंय? मग यांचेच असले दोन नंबरचे धंदे आहेत की काय? अशी शंका येतेय.

चौकट:

यांचे तर गुलाल खोबरं तिकडे चांगभलं...

गुलाल खोबर तिकडे चांगभलं म्हणणारी प्रवृत्ती विरोधकांची आहे. मला जनतेनी निवडून दिलं आहे. माझा राजीनामा मागायचा अधिकार विरोधकांना नाही. ज्यांना लोकांनी घरी बसवलंय ते माझा राजीनामा मागतायत याचे आश्चर्य वाटते, असे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे म्हणाल्या. कोरोनाकाळात लोकांसाठी मी काम केलं, तुम्हाला कोणी अडवलं होतं? पण तुम्ही काहीच केलं नाही. फक्त आमची माप काढण्यातच तुम्ही वेळ घालवला. यापुढेही तुम्ही आमच्यावर अशीच टीका करत बसा आणि आम्ही मात्र शहरासाठी विकासकामेच करणार आहोत, असेही त्या शेवटी म्हणाल्या.

Web Title: The allegations of those whose businesses run on percentage are ridiculous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.