सत्तेसाठी ‘आघाडी’च; पण जुनी की नवी !
By Admin | Published: February 22, 2017 10:57 PM2017-02-22T22:57:54+5:302017-02-22T22:57:54+5:30
कऱ्हाड तालुका : कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही; सत्ता कोणाची येणार याचीच चर्चा
प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड
तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ७३ टक्के मतदान मंगळवारी झाले. निवडणुकीपूर्वी अन् निवडणुकीनंतर काही ठिकाणी वादाचे प्रकारही घडले. आता पंचायत समितीवर कोणाची सत्ता येणार याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. जो-तो आपापल्या परिने सत्तेचा दावा करीत आहे. पण एकूणच चित्र पाहता कोणा एकाला स्पष्ट बहुमताची शक्यता दिसत नाही. सत्तेसाठी पुन्हा आघाडीच करावी लागणार, हे निश्चित. पण सध्या पंचायत समितीत असणारी राष्ट्रवादी व उंडाळकर आघाडीच पुढे राहणार की दक्षिणेत अवतरलेली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सत्तेसाठी एकत्रित येणार, हे पाहावे लागेल.
सातारा जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका म्हणून कऱ्हाडकडे पाहिले जाते. येथे उत्तर अन् दक्षिण असे विधानसभेचेही दोन मतदारसंघ आहेत. या तालुक्यातून १२ जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधीत्व करतात. तर २४ पंचायत समिती सदस्य असणारी जिल्ह्यातील सर्वात मोठी पंचायत समिती कऱ्हाडचीच आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या कऱ्हाड तालुक्याला जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात महत्त्व आहे.
अलीकडच्या काही वर्षांत कऱ्हाड तालुक्याचे राजकारण प्रत्येक निवडणुकीला वेगळे वळण घेताना दिसते. गेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिणेवर स्वारी केली. त्यामुळे बंडखोर उंडाळकर अस्वस्थ झाले. त्यांनी भोसलेंना बरोबर घेत ‘मैत्रिपर्व’ सुरू केलं. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते तुटलं ! त्याचवेळी कृष्णाकाठी ‘मनोमिलना’चे वारे वाहू लागले. दुसरीकडे ‘उत्तर’च्या आमदारांची इच्छा नसतानाही वाठारकर आबा, रेठरेकर दादा अन् उंडाळकर भाऊ यांच्या मागणीमुळे कुठे नव्हे ती दक्षिणेत काँगे्रस-राष्ट्रवादीची आघाडी पाहायला मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत एकाच तालुक्यात दक्षिणेत तिरंगी तर उत्तरेत चौरंगी लढत पाहायला मिळाली. काही ठिकाणी या लढती बहुरंगीही झाल्या.
दक्षिणेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, उंडाळकरांची विकास आघाडी अन् डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप अशी लढत झाली. तर उत्तरेत काँगे्रस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने ही लढत चौरंगी झाली. त्यामुळे मतविभागणीचा फायदा कोणाला अन् तोटा कोणाला हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
एकूणच पंचायत समितीवर एकट्या राष्ट्रवादीचं घड्याळ सत्तेची ‘टिक-टिक’ करू शकणार नाही. त्यासाठी ते काँगे्रसच्या हातात ‘हात’ घालणार की ‘कपबशी’तील चहा पित-पित जुनी आघाडीच पुढे कायम ठेवणार, हे पाहावे लागणार. शिवाय ‘कमळ’ हातात घेतलेले ‘बाबा’ आपल्या सदस्यांना विरोधी बाकांवर बसायला सांगणार की ‘मैत्रिपर्वा’चा नवा अध्याय सुरू करीत सत्तेत जाण्याचा प्रयत्न करणार, हे ही पाहावे लागेल. कारण राजकारणात कोणाचा कायमचा शत्रू नसतो म्हणे.