‘युती’कडून रिपाइंला वाटाण्याच्याच अक्षता !

By admin | Published: May 12, 2016 10:20 PM2016-05-12T22:20:15+5:302016-05-13T00:15:08+5:30

जिल्हा नियोजन : सदस्यांच्या यादीत ६ धनुष्यबाण, ४ कमळ, १ जागेवर कपबशी

'Alliance' from the RPI! | ‘युती’कडून रिपाइंला वाटाण्याच्याच अक्षता !

‘युती’कडून रिपाइंला वाटाण्याच्याच अक्षता !

Next

सातारा : जिल्हा नियोजन समितीमधील निमंत्रित सदस्यांच्या यादीमध्ये शिवसेना, भाजप व राष्ट्रीय समाज पक्ष या तीनच पक्षांना संधी देण्यात आली आहे. साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे हे शिवसेनेचे असल्याने त्यांचा या निवडीवर वरचष्मा राहिला. शिवसेनेने ६, भाजपने ४ तर रासप या आपल्या मित्रपक्षाला त्यांनी केवळ १ जागा दिली आहे. युतीच्या या संसारात रिपब्लिकन पक्ष मात्र नियोजन समितीनासून दूरच तिष्ठत राहिला आहे.
नियोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्यांच्या नेमणुकीवरून अनेक महिने अहमहिका सुरू होती. मधल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केलेल्या ११ सदस्यांची यादी ‘लिक’ झाली होती. या यादीमध्ये जी नावे होती, त्यापैकी बहुतांश नावे पुढे मुख्यमंत्र्यांकडे गेली होती. मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर त्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केले होते. ही यादी नियोजन विभागाच्या लालफितीत अडकल्याचेही या वृत्तात स्पष्ट करण्यात आले होते. यानंतर अखेर या यादीवर राज्याच्या नियोजन विभागाने शिक्कामोर्तब करून ही यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठविली आहे.
शिवसेनेच्या वतीने चंद्रकांत जाधव (तासगाव, ता. सातारा), महेश शिंदे (भुर्इंज, ता. वाई), गणेश रसाळ (म्हसवड, ता. माण), अर्जुन मोहिते (वर्धनगड, ता. खटाव), गोविंदराव शिंदे (राणंद, ता. जावळी), एकनाथ ओंबळे (केडंबे, ता. जावळी) यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपच्या वतीने माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर (मायणी, ता. खटाव), माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील (मलकापूर, ता. कऱ्हाड), पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ. अतुल भोसले (कऱ्हाड), बाळासाहेब खाडे (पळशी, ता. माण) यांची तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेखर गोरे अशी एकूण ११ जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या ११ व्यक्तींची विशेष निमंत्रित म्हणून जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करीत असल्याचे शासन निर्णय पत्रात नमूद करण्यात आले आहे. विशेष निमंत्रित म्हणून करण्यात आलेल्या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत किंवा शासनाकडून या नियुक्त्या रद्द होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल, तोपर्यंत अबाधित राहतील, असेही निर्णय या पत्रात नमूद केले आहेत.
नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या निवडीनंतर आता युतीमधील राजकारण पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या निवडीमुळे रिपाइंमध्ये प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे यांनी मित्रपक्ष म्हणून आम्हाला किमान दोन जागा मिळतील, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते, पण तसे झाले नाही. ‘आमच्याशी लग्न केले असले तरी नांदवायला कोणी नेईना,’ अशी भावना जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली होती, तिच भावना सत्यात उतरल्याचे चित्र सध्या असून, पालिका निवडणुकांमध्ये रिपाइं याचा वचपा काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)

राजेंद्र खाडे यांच्या ऐवजी बाळासाहेब खाडे
पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शिफारस केलेल्या यादीमध्ये डॉ. राजेंद्र खाडे यांचे नाव होते, त्यांच्या जागी बाळासाहेब खाडे यांना भाजपच्या वतीने संधी देण्यात आली आहे.

Web Title: 'Alliance' from the RPI!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.