रायफलची परवानगी द्या, म्हणत ग्रामसेवकाला मारहाण, साताऱ्यातील खामगाव ग्रामसभेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 04:49 PM2022-12-01T16:49:50+5:302022-12-01T16:50:21+5:30
ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत हा प्रकार घडला.
जिंती : संरक्षणासाठी रायफल पाहिजे आहे, मला रायफल बाळगण्यासाठी परवानगी द्या, असे म्हणत ग्रामसेवकांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा प्रकार घडला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल शिवाजी जाधव (गोसावीवस्ती, रा. खामगाव, ता. फलटण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. फलटण तालुक्यातील खामगाव येथील ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत हा प्रकार घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ग्रामसेवक हणमंत विष्णू चव्हाण (वय ३७, रा. कोळकी, ता. फलटण मूळगाव शेवरी, ता. माण) यांच्याकडे खामगावचा ग्रामसेवक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. दि. २९ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीची मासिक बैठक सुरू असताना संशयित आरोपी अनिल शिवाजी जाधव ग्रामपंचायतीमध्ये येऊन म्हणाले, ‘मला संरक्षणासाठी रायफल पाहिजे. तुम्ही मला रायफल बाळगण्यासाठी परवानगी द्या’, असे म्हणून अर्ज बैठकीत दिला.
यावेळी बैठकीमधील उपस्थित लोक त्याला समजावून सांगत असताना जाधव याने बैठकीमधील कोणाचेही ऐकून न घेता फिर्यादी ग्रामसेवक यांच्याजवळ जात ‘तुम्ही मला आता दाखला द्या, मी या ठिकाणाहून जाणार नाही,’ असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की केली. याबाबत फिर्यादी ग्रामसेवक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.