खटाव तालुक्यात पिके काढण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:38 AM2021-03-05T04:38:32+5:302021-03-05T04:38:32+5:30
खटाव : खटावमध्ये तसेच परिसरातील रब्बी हंगामातील ज्वारी व हरभरा पिकाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईला ...
खटाव : खटावमध्ये तसेच परिसरातील रब्बी हंगामातील ज्वारी व हरभरा पिकाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईला सामोरे जावे लागले.
काही ठिकाणी ज्वारी व हरभरा काढणीची लगबग तर काढून ठेवलेल्या पिकाची ट्रॅक्टरला जोडलेल्या मळणी मशीनच्या साह्याने मळणी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.
बदलत्या काळात नवीन तंत्रज्ञान वापरून शेतकरी कमी वेळात धान्य मळणे सोयीचे मानत असल्यामुळे आता मळणी यंत्रणा मागणी जास्त असल्यामुळे ज्यादाचे मजूर लावून लवकर पीक काढून तयार झाल्यावर लगेचच मळणी यंत्र बोलावून घेत आहेत. त्यामुळे मशीनसाठी आधीच नंबर लावावे लागत आहेत.
बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी रब्बी हंगामातील ज्वारी व हरभरा पीक घटण्याची शक्यता आहे. रब्बी पिकाच्या सुरुवातीला बदलत्या हवामानाच्या प्रभावामुळे पिकावर त्याचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात झाल्यामुळे एकरी उत्पादनातही घट होत आहे.
तर दुसरीकडे वाढत्या महागाईचा परिणामही शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. मशीनच्या साह्याने मळणी करताना मळणीच्या दरातही वाढ झाल्यामुळे शेतकऱ्याला आता वाढत्या मजुरीला तसेच मळणीनंतर प्रत्येक पोत्याच्या पाठीमागे गेल्या वर्षीपेक्षा अधिक दर द्यावा लागत आहे.
इंधन दरवाढीचा चटका सर्वांनाच सोसावा लागत आहे. यंदा डिझेलच्या दरवाढीचा चटका शेतकऱ्यांना बसत आहे. रोज वाढत जाणाऱ्या किमतीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तर ट्रॅक्टर चालकांनाही इंधन दरवाढीमुळे पेरणी तसेच मळणीच्या दरात वाढ करावी लागली आहे.
(कोट)
आधीच रब्बी हंगामातील पिकाचे क्षेत्र घटल्यामुळे तसेच चालू वर्षी मालातही घट येत असल्यामुळे पोत्याची संख्या अपेक्षेपेक्षा कमी होत आहे. डिझेलचे चढे दर पाहता या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत पोत्यामागे ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मळणीसाठी ज्वारीच्या एका पोत्याला १०० रुपये तर गहू व हरभरा मळणीकरिता ३०० रुपये प्रति पोत्याला दर होता. परंतु वाढत्या महागाईची झळ या वर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. ज्वारी मळणीसाठी एक पोत्याला १५० रुपये तर गहू, हरभरा ४०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्याला द्यावे लागत आहेत.
-योगेश माने, मळणीयंत्र मालक, खटाव
०४खटाव
कॅप्शन : खटावमध्ये शेतकऱ्यांची आता रब्बी पिकाच्या काढणीबरोबरच मळणीची लगबग सुरू आहे. (छाया : नम्रता भोसले)