मसूर परिसरात खरीपपूर्व शेतीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:42+5:302021-05-28T04:28:42+5:30

मसूर परिसर शेती वार्तापत्र लोकमत न्यूज नेटवर्क मसूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असला तरी मसूर परिसरातील ...

Almost pre-kharif farming in Masur area | मसूर परिसरात खरीपपूर्व शेतीची लगबग

मसूर परिसरात खरीपपूर्व शेतीची लगबग

googlenewsNext

मसूर परिसर शेती वार्तापत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

मसूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असला तरी मसूर परिसरातील शेतकरी खरीपपूर्व शेतीची मशागत करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे तर अखेरचे दिवस असल्याने आले व आडसाली ऊस लागणीची कामेही जोमाने सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

यावर्षी वळिवाने हजेरी लावल्याने उन्हाळ्यामध्ये नांगरट करून ठेवलेल्या शेतातील ढेकळे पूर्णत: फुटली असल्याने या शेतात शेणखत टाकून ते शेत ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटर मारण्याचे काम सुरू आहे. परिसरात बागायतीचे क्षेत्र असलेल्या ठिकाणी रोटर मारून सरी सोडण्याचे काम सुरू आहे. रोटर मारण्यासाठी एकरी २८०० रुपये, तर सरी सोडण्यासाठी १८०० ते २००० रुपये दर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

खरिपासाठी तयार करण्यात येणाऱ्या शेतात रोटर मारून बैलांच्या साहाय्याने शेत कुळवण्याचे काम सुरू आहे. शेत कुळवल्यानंतर त्यामध्ये चांगल्या पद्धतीने पेरणी करता येते. यासाठी खरीपपूर्व मशागत करण्याचे काम सुरू आहे. ऊस गेलेल्या शेतातील खोडकी बाहेर काढणे. शेतात असणारे अन्य दगड वगैरे बाहेर काढून शेती पेरणीयोग्य करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

सध्याच्या यांत्रिक युगात बैलजोड्या दुरापास्त होत चालल्या असल्या तरी काही शेतकरी वर्गाने आपल्या सर्जा-राजाच्या जोडीला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळले आहे. त्यांच्या साहाय्याने शेतीची मशागत करण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे.

काही ठिकाणी भाताची पेरणी धूळवाफेवर केली जात आहे. तर उसाला पर्यायी पीक म्हणून आले लागणीचे अखेरचे दिवस असल्याने आले लागणीची कामेही जोमाने सुरू आहेत, तर आडचाली उसाची लागण करण्याचेही काम सुरु आहे.

परिसरात बऱ्यापैकी बागायती क्षेत्र वाढल्याने अशा परिसरात टोकणपद्धतीने भुईमूग, घेवडा, सोयाबीन, मका आदी पिके घेतली जातात. त्या शेतात सरी सोडून शेती तयार करण्याचे काम जोमाने सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे जग थांबले तरी शेतकरी वर्गाला ठराविक वेळेत शेतीची कामे करण्यासाठी लगबग करावी लागते. त्यांना थांबून चालत नाही. ते आपल्या कुटुंबासह आपल्या काळ्या आईची मशागत करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.

फोटो आहेत :

Web Title: Almost pre-kharif farming in Masur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.