अण्णासाहेबांबरोबरच ग्रामस्थांच्याही हाती लेखणी

By Admin | Published: December 25, 2014 09:21 PM2014-12-25T21:21:37+5:302014-12-26T00:21:27+5:30

डाटा आॅपरेटर संप : चाळीस दिवसांपासून संगणकावरील दाखले बंद ; जिल्ह्यातील सातशे जण बंदमध्ये

Along with Annasaheb, the villagers also write their handwriting | अण्णासाहेबांबरोबरच ग्रामस्थांच्याही हाती लेखणी

अण्णासाहेबांबरोबरच ग्रामस्थांच्याही हाती लेखणी

googlenewsNext

सातारा : गावाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीतील संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) यांनी चाळीस दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या हाती दाखले देण्यासाठी आता लेखणी आली आहे. त्याचबरोबर अनेकवेळा छापील अर्ज घेऊन ग्रामस्थ त्यावर स्वत: लिहित आहेत. त्यानंतर ग्रामसेवकांच्या सह्या घेण्यात येत आहेत. त्यामुळे अण्णासाहेबांच्या बरोबरच ग्रामस्थांच्याही हातातही लेखणी दिसत आहे.
ग्रामपंचायत ही गावचा कणा समजली जाते. ग्रामपंचायतीमार्फत गावचा कारभार पाहिला जातो. सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या बरोबरीने ग्रामसेवक गावच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. ग्रामसेवक व सरपंचाकडून काही दाखले देण्यात येतात. शासकीय कामांसाठी हे दाखले महत्त्वाचे असतात. मागील काही वर्षांपर्यंत ग्रामसेवकांनी किंवा त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी हाताने लिहिलेला दाखला चालत होता. मात्र, काही वर्षांपूर्वीपासून ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांच्या जोडीला संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) हे पद निर्माण करण्यात आले. जवळपास राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीत हे पद तयार झाले. त्यामुळे राज्यात आज सुमारे २७ हजार तर सातारा जिल्ह्यात १,०२७ परिचालक कार्यरत आहेत. त्यांना शासन निर्णयानुसार पगार देण्यात येत आहे. मात्र, यामधील सुमारे सातशे परिचालकांनी दि. १२ नोव्हेंबरपासून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. आतापर्यंत संगणकावरून काही सेकंदात दाखल मिळत होता. मात्र, आता या काम बंदमुळे अनेक ग्रामसेवकांना दाखला लिहून देणे भाग पडले आहे. दररोज अनेकजण दाखले मागण्यासाठी येतात. त्याची पूर्तता करता-करता दिवस संपत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांना या काम बंदमुळे इतर कामांपेक्षा दाखला देण्यातच जास्त वेळ द्यावा लागत आहे.
सातारा जिल्ह्यात सुमारे १५०० ग्रामपंचायती असून, सध्या १ हजार २७ संगणक परिचालक कार्यरत आहेत. जवळपास सर्व तालुक्यातील परिचालकांनी काम बंद केले आहे. त्यामुळे ऐंशी टक्क्यांहून अधिक ठिकाणचे संगणकावरून दाखले देण्याचे काम बंद झाले आहे. शासनाने संगणकावरील दाखलेच गृहित धरण्याचे धोरण आखले आहे. या काम बंदमुळे हस्तलिखित दाखले शासकीय कामांसाठी चालणार का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)


१९ प्रकारचे दाखले
ग्रामपंचायतीमार्फत १९ प्रकारचे दाखले देण्यात येतात. आॅनलाईन रजिस्टर नोंद करणे, जन्म, मृत्यूचा दाखला देणे, रहिवासी, वर्तणूक, बांधकाम परवाना, दारिद्र्यरेषेखालील दाखला आदी दाखले देण्यात येतात. संगणकावर डाटा तयार असल्यामुळे काही सेकंदात हे दाखले मिळत होते; पण आता हस्तलिखितामुळे खूपच वेळ जात
आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणिंना सामोरे जावे लागत आहे.


तोकडा पगार...
१३ व्या वित्त आयोगातून आठ हजार पाचशे रुपये जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे वर्ग होतात. तेथून संबंधित एका कंपनीकडे हे पैसे जातात. त्यानंतर ती कंपनी संगणक परिचालकांना पगार देते. बारावीवाल्यांना तीन हजार आठशे तर, पदवीधारकांना चार हजार शंभर रुपये देण्यात येतात. त्यामुळे कमी पगार मिळत असल्याचाही आरोप संघटना करीत आहे.


आम्ही सर्वांची काळजी करतो. दाखले देण्याची जबाबदारी आम्हीच घेतो. लोकांचे ऐकतो; पण आमची काळजी शासनाला नाही. आमच्या मागण्यांबाबत कोणी ऐकत नाही. म्हणून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला.
- प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष संगणक परिचालक संघटना

Web Title: Along with Annasaheb, the villagers also write their handwriting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.