VidhanSabha Election 2024: आता राजकीय फटाके फुटणार; सातारा जिल्ह्यात नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही लागले तयारीला
By दीपक शिंदे | Published: October 16, 2024 03:45 PM2024-10-16T15:45:15+5:302024-10-16T15:49:03+5:30
जनता कोणाच्या बाजुने उभी राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार
दीपक शिंदे
सातारा : आज, उद्या करत करत अखेर विधानसभा निवडणूक जाहीर झाली. निवडणुकीअगोदर राजकीय बदलाबदलीचे सुरू झालेले वातावरण अजून तापणार असून यापुढेही असेच फटाके दिवाळी अगोदर फुटत राहणार, असे चित्र दिसत आहे. लोकसभेत महायुतीलामहाविकास आघाडीने रोखल्यामुळे आता महायुती अधिक आक्रमक झाली आहे. तर शरद पवारांना सोडून गेलेले लोक आता पुन्हा येऊ लागल्याने महाविकास आघाडीचीही हवा होऊ लागली आहे. यामध्ये जनता कोणाच्या बाजुने उभी राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या आहेत. लोकसभेला मिळालेली मते आणि विधानसभेचे गणित यांचा कधीच मेळ घालता येत नाही. लोकसभेला १२ ते १३ लाखांचा मतदारसंघ असतो तर विधानसभेला हेच मतदान अगदी दीड ते तीन लाखांपर्यंत आलेले असते. जेवढे मतदान कमी तेवढा धोका अधिक असतो. त्यातच पुन्हा जाती-पातीचे राजकारण, फाटाफूट आणि नाराजी यामुळे अधिक अडचणी वाढतात.
लोकसभेतील लोकांच्या प्रतिसादानंतर महायुतीने विविध योजनांचा धडाका लावत लोकांना आपणच फक्त तुमचा विचार करू शकतो, असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकारने विविध महामंडळे सुरू केली आहेत. महिला, विद्यार्थी, वृद्ध या सर्वांसाठी योजना सुरू केल्यामुळे त्यांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला आहे. तर महाविकास आघाडीने राज्यात होणारे खून, बलात्कार, महिलांना संरक्षण न मिळणे आणि राज्याला आर्थिक अडचणीत आणणे, असे आरोप करत राज्याकडे भविष्याच्या दृष्टीने पाहणारा दूरदर्शी नेता नसल्याचा आरोप केला जात आहे.
या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला..
आमदार शिवेंद्रसिंहराजे
सातारा - सातारा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना यावेळी पुन्हा पाचव्यांदा रिंगणात आहेत. त्यांची एकतर्फी लढत असल्याचे म्हटले जात असले तरी या लोकांना गृहीत धरून चालत नाही.
आमदार बाळासाहेब पाटील
कऱ्हाड उत्तर - येथून माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी असेल, तर त्यांच्यासमोर मनोज घोरपडे किंवा धैर्यशील कदम असतील. याठिकाणी एकास एक लढत झाली तरच काहीतरी वेगळे पाहायला मिळेल, असे म्हटले जाते.
आमदार पृथ्वीराज चव्हाण
कऱ्हाड दक्षिण - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या मतदारसंघातून लढत देत आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला मानणारा आणि पाठीशी राहणारा आहे. मात्र, अतुल भोसले यांनीही यावेळी जोरदार तयारी केली केल्याने निवडणूक तेवढी सोपी असणार नाही.
आमदार शंभूराज देसाई
पाटण - पाटण मतदारसंघातून सलग निवडून देण्याची प्रथा नाही. गतवेळी मात्र शंभूराज देसाई यांनी ही किमया केलेली आहे. कितीही कामे केली तरी लोक ज्यांना निवडून द्यायचे त्यांनाच देतात. त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा याठिकाणी लागणार आहे.
आमदार मकरंद पाटील
वाई - वाई, महाबळेश्वर, खंडाळा या तीन तालुक्यांसाठी असलेला हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर मकरंद पाटील यांची चांगली पकड आहे. पण शरद पवार काही नवीन खेळी करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आमदार जयकुमार गोरे
माण - आमदार जयकुमार गोरे हे याठिकाणी निवडणूक रिंगणात असतील, तर त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, रणजितसिंह देशमुख यांच्यापैकी एक जण करणार आहे.
आमदार महेश शिंदे
कोरेगाव - हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून आता शिवसेनेच्या ताब्यात गेला आहे. याठिकाणी शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्यातच लढत होणार आहे. दोघांचीही प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लावली जाणार आहे.
आमदार दीपक चव्हाण
फलटण - विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे सलग चौथ्यांदा या मतदारसंघातून निवडून जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर त्यांना भाजपकडून सचिन कांबळे पाटील यांच्या माध्यमातून शह देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
सध्याचे जिल्ह्यातील आमदारांचे बलाबल
काँग्रेस - ०१
राष्ट्रवादी - ०१
राष्ट्रवादी (श.प.) - ०२
शिंदेसेना - ०२
भाजप - ०२
संभाव्य लढती
सातारा : शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) विरुद्ध दीपक पवार, अमित कदम (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन मोहिते (उद्धवसेना)
पाटण : शंभूराज देसाई (शिवसेना) विरुद्ध सत्यजित पाटणकर (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस)
कऱ्हाड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) विरुद्ध अतुल भोसले (भाजप)
कऱ्हाड उत्तर : बाळासाहेब पाटील (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध मनोज घोरपडे (भाजप)
कोरेगाव : महेश शिंदे (शिवसेना) विरुद्ध शशिकांत शिंदे (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस)
वाई : मकरंद पाटील (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध विराज शिंदे (काँग्रेस)
फलटण : दीपक चव्हाण (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध सचिन कांबळे पाटील (भाजप)
माण : जयकुमार गोरे (भाजप) विरुद्ध प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस)
सर्व विद्यमान लढणार
सातारा विधानसभा मतदारसंघातून सर्व आठही आमदार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. महायुती आणि महाआघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये पक्षांचे विभाजन झाल्यामुळे एकमेकांसोबत असलेले नेते आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत.
नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का
सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नवीन चेहरे लढण्यास उत्सुक आहेत. राजकीय पक्ष त्यांना किती संधी देतात यावर या निवडणुकीतील चुरस पहायला मिळणार आहे. काही ठिकाणी नव्यांना संधी मिळू शकते.