आधीच फटाक्यांचा वास; त्यात थंडीचा त्रास!
By admin | Published: October 27, 2014 09:12 PM2014-10-27T21:12:04+5:302014-10-27T23:45:56+5:30
ऐन दिवाळीत हवा बदलाचा परिणाम : वातावरणात संसर्गामुळे चिमुकल्यांच्या आरोग्य तक्रारीत वाढ
सातारा : हिवाळ्याच्या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे या दिवसांत संसर्गाचे धोके वाढतात. यावेळी ऐन हिवाळ्यात पाऊस पडल्यामुळे त्याचा विपरित परिणाम ज्येष्ठ आणि चिमुकल्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. म्हणूनच या बदललेल्या वातावरणात पाणी उकळून आणि भरपूर पिण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.
थंडीची चाहूल घेऊनच दिवाळीचे आगमन होते. त्यामुळे वातावरणात पुरेसा गारवा असतो. यावेळी पहिल्यांदाच ऐन दिवाळी सणात पाऊस पडल्यामुळे घरातील अनेकांच्या प्रकृती बिघडल्या आहेत. त्यात हिवाळ्यात फारशी तहान लागत नाही. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने रोग प्रतिकार करण्याची शक्ती क्षीण होते.
हिवाळ्यात पाऊस पडल्यामुळे वातावरणात सर्दी, खोकला, कफ, ताप निर्माण करणाऱ्या जंतूंचा फैलाव होतो. काही मुलांच्या अंगावर, तळहात आणि तळ पायावर लाल रंगांचे पुरळ उठत आहेत. हे पुरळही वातावरणातील संसर्गाचा परिणाम आहे. कितीही खबरदारी घेतली तरीही औषधांचा योग्य डोस देणे गरजेचे आहे. साधारण चार ते पाच दिवस लहान मुलांमध्ये हा संसर्ग राहात असल्याचे दिसते. त्यामुळे या दिवसांत कोणताही आजार चिमुकल्यांच्या अंगावर काढण्यापेक्षा किंवा त्यांना घरगुती उपाय करण्यापेक्षा तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.
फटाक्यांमुळे पाच ते दहा वर्षांतील मुले जखमी होतात. वातावरणातील बदलाचा परिणाम सर्दी स्वरूपात सहा महिन्यांच्या बाळापासून सहा वर्षांच्या मुलांपर्यंत होऊ शकतो. शरीरावर पुरळ उठण्याचे प्रकार एक ते सात वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अधिक आहे. तर श्वसनाच्या आजारांचा त्रास एक ते चार वर्षांच्या मुलांना होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. (प्रतिनिधी)
फटाक्यांच्या वासामुळे श्वसनाचे आजार
दिवाळीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. आवाजाबरोबरच शोभेचे फटाके उडविण्याकडे नागरिकांचा कल असतो. फटाके फुटल्यानंतर त्यातून येणारा धूरही आता अनेकांना त्रासदायक ठरू लागला आहे. विशेषत: लहान मुलांना याचा त्रास अधिक होत आहे. फटाके पेटवताना आणि फुटल्यानंतर त्यांची होणारी गडबड आणि दंगा यामुळे हा धूर त्यांच्या तोंडात जातो. यामुळे मुलांसह ज्येष्ठांनाही श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. घशात खरखरणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. फटाक्यांच्या या धुरापासून जास्तीत जास्त अंतरावर थांबणे हाच उपाय आहे.
तान्हुल्यांना फक्त स्पंजिंग!
दिवाळीनिमित्त अभ्यंगस्नान केले जाते. हे स्नान तान्हुल्यांनीही करावे, अशी आग्रही मागणी ज्येष्ठांची असते. वास्तविक या दिवसात गारठा लक्षात घेता तान्हुल्यांना दोन-तीन दिवसांतून एकदा अंघोळ व इतर वेळी केवळ गरम पाण्याने अंग पुसले तर सर्दीचा त्रास जाणवणार नाही. तसेच या दिवसांत डोके कोरडे राहील याचीही खबरदारी आवश्यक असते.
बाहेरचे अन्नपदार्थ टाळाच
दिवाळीच्या दिवसांत घरात पाहुण्यांची गर्दी मोठी असते. त्यामुळे अनेक घरांमध्ये बाहेरून अन्नपदार्थ नेऊन ते खाणे याकडे कल दिसतो; पण हे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. वातावरणातील बदल झाल्यामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती क्षीण झालेली असते. त्यातच बाहेरचे अन्नपदार्थ पुरेशी स्वच्छता न ठेवता केलेले असतील, तर त्यामुळे जंतू संसर्गाचा धोका अधिक संभवतो. यामुळे पोटात दुखणे, उलटी होणे यासारखे प्रकारही घडू शकतात.
वातावरणातील बदलांमुळे सध्या मुलांना संसर्गजन्य आजार होत आहेत. स्वच्छेतीची काळजी घेण्याबरोबरच योग्य ते औषधोपचार घेतले, तर मुलांची प्रकृती लवकर बरी होऊ शकते.
- डॉ. अच्युत गोडबोले