काळाने आधीच दिला होता इशारा!
By Admin | Published: September 9, 2014 10:37 PM2014-09-09T22:37:34+5:302014-09-09T23:43:50+5:30
इमारत धोकादायक : पालिकेची नोटीस गंभीरपणे न घेतल्याने तिघांचा बळी
सातारा : राजपथावरील सुमारे १०५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ इमारतीचा काही भाग कोसळला होता. जणू पुढे होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेचा इशाराच मागील महिन्यातील तुफान पावसात मिळाला होता. यानंतर पालिकेने इमारत मालकाला नोटीसही दिली होती. या नोटिसीनंतर जर तत्काळ घराच्या भिंती उतरविल्या असत्या तर जीवितहानी टळली असती. शहरात अशा ११८ इमारती धोकादायकरित्या उभ्या आहेत. जीव गेल्यावरच इमारत पाडायची, हा एकमेव ‘अजेंडा’ शहरात पाहायला मिळत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारती उतरवून घेण्याबाबत पालिका इमारत मालकांना नोटीस दिली जाते. सोमवारी अनंत चतुर्दशीदिवशी राजपथावरील १४८, भवानी पेठ या इमारतीची भली मोठी भिंत कोसळून तीन जणांना प्राण गमवावे लागले. धोकादायक इमारतींपासून मोठा अनर्थ घडू शकतो, याबाबत संबंधितांना गांभीर्यच नसल्याचे या दुर्घटनेने स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, २० आॅगस्ट रोजी सातारा शहरात तुफान पाऊस कोसळला होता. या पावसामध्ये या इमारतीचा काही भाग कोसळला होता. उर्वरित भाग कोसळण्याच्या मार्गावर होता. पालिकेने दिलेल्या नोटीसीनंतर संबंधित घरमालकाने इमारतीवरील पत्रे काढले होते. त्यामुळे घराच्या भिंती पावसाच्या पाण्याने भिजत होत्या. या भिजलेल्या भिंती धोकादायक बनल्या. अनंत चतुर्दशीला निमित्त झाले अन घराची भलीमोठी भिंत कोसळून तिघे गाडले गेले. शहरातील बहुतांश धोकादायक इमारतींबाबत वादाचे विषय आहेत. कोर्टाचा ‘स्टे’ आहे, असे कारण पुढे करुन इमारत उतरविण्यात टाळाटाळ केली जाते. मात्र, अशा इमारतीशेजारी राहणारे लोक जीव मुठीत घेऊन वावरतात. लोकांच्या जिवाला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन अशा इमारती पाडणे आवश्यक बनले आहे. पालिकेने याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)