महामोर्चासाठी पोवई नाका दुर्गा मंडपाला पर्यायी जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2016 11:41 PM2016-09-25T23:41:58+5:302016-09-26T00:14:38+5:30

पोलिसांची तयारी : संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुचविला पर्याय

Alternative place for Pravai Naka Durga Mandap for the upper house | महामोर्चासाठी पोवई नाका दुर्गा मंडपाला पर्यायी जागा

महामोर्चासाठी पोवई नाका दुर्गा मंडपाला पर्यायी जागा

Next

सातारा : साताऱ्यात ३ आॅक्टोबरला होणारा महामोर्चा येथील पोवई नाक्यावर विसावणार असल्याने या महामोर्चाला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून पोलिसांनी पोवई नाक्यावरील दुर्गोत्सोव मंडळाला पर्यायी जागा सूचविली आहे. यासंदर्भात सोमवार दि. २६ रोजी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महामोर्चास वीस लाखांहून अधिक मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे. सातारा शहरात राजपथ आणि कर्मवीर पथ असे दोन महत्त्वाचे रस्ते आहेत. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे शहरातील हे दोन रस्ते अपुरे पडण्याची शक्यता आहे. पोवई नाक्याला सात रस्ते जोडतात. या रस्त्यावर लोक उभे राहणार आहेत. त्यामुळे मोठी गर्दी होणार आहे. त्यातच दुर्गोत्सव सुरू होत आहे. दरवर्षी पोवई नाक्यावरील मंडळ दुर्गोत्सव साजरा करते. यंदाही या मंडळाने शिवाजी सर्कलला दुर्गोत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे. मात्र, त्याच दिवशी मोर्चा निघणार असल्याने पोलिसांनी या मंडळाला कालिदास पेट्रोलपंपाजवळ या मंडळाला पर्यायी जागा सूचवली आहे. या मंडळानेही सहकार्याची भूमिका घेतली आहे, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एसपींकडून महामोर्चा मार्गावर पाहणी
साताऱ्यात दि. ३ रोजी होणाऱ्या महामोर्चास जिल्हा पोलिस दल सतर्क झाले असून, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांसह महामोर्चासाठी लागणाऱ्या पार्किंग व्यवस्थेची तसेच मोर्चा मार्गाची पाहणी केली. पार्किंग व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी कराव्या लागणाऱ्या उपयायोजनांबाबत अधीक्षक पाटील यांनी सूचना केल्या.
पंपचालकांनी वाढविला पेट्रोल-डिझेलचा कोटा
कोरेगाव : मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील महामोर्चा आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढणार आहे. मोर्चासाठी शेकडो वाहने साताऱ्यात येणार आहेत. या वाहनांची पेट्रोल-डिझेलची संभाव्य गरज पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांनी तयारी केली आहे. त्यादृष्टीने जादा साठा करून ठेवण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्याला चाकण आणि मिरज येथील डेपोमधून इंधन पुरवठा होतो. या काळातील वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यावरचा ताण लक्षात घेता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस इंधनाचा जादा साठा करून ठेवण्याचा प्रयत्न आहे. चौथा शनिवार आणि रविवार असल्याने पंपधारकांचे बँकिंग व्यवहार ठप्प झाले. बँकिंग व्यवहार सोमवारी पूर्ण होऊन मंगळवारपासून इंधनाचा मुबलक पुरवठा होण्याची शक्यता आहे.
साताऱ्यात सोमवार, दि. ३ आॅक्टोबरला निघणार असलेल्या महामोर्चात आजवरच्या मोर्चातील उपस्थितांचे सर्व विक्रम मोडण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या सर्वच भागातून मराठा समाजबांधव सहभागी होणार आहे. जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अनेक दिशेला जिल्ह्याचे शेवटचे टोक सरासरी शंभर किलोमीटरच्या घरात आहेत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना वाहनांचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही.
महामोर्चाच्या संयोजक व जिल्हा प्रशासनाने मोर्चाबाबत जय्यत तयारी सुरू केली आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ ते पाचवड फाटा हा भाग सातारा जिल्ह्यात येत असून, अन्य राज्यमार्ग देखील जिल्ह्यात आहेत. प्रत्येक भागात पेट्रोलपंप मोठ्या प्रमाणावर असून, त्यामध्ये गॅसपंपांचा देखील समावेश आहे.
साताऱ्यातील महामोर्चासाठी जास्तीत जास्त लोक जाणार असल्याने वाहनांची संख्या वाढणार असल्याने सहाजिक पेट्रोल व डिझेलचा वापर त्यादिवशी वाढणार आहे. मोर्चेकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पेट्रोल पंपधारकांनी जास्तीत जास्त प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मोर्चातील वाहनांना इंधन कमी पडू नये, यासाठी खबरदारी घेत असताना पेट्रोल पंपावर मूलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलपंपांना पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सांगली जिल्ह्यातील मिरज येथील डेपोमधून इंधन पुरवठा केला जातो. चाकण डेपोतून येणारी वाहने लोणंद-वाठार स्टेशन मार्गे साताऱ्यात आणि तेथून पुढे जातात. वडूथ-आरळे येथील पुलाला भगदाड पडल्याने तेथील वाहतूक कोरेगावमार्गे वळविली आहे. सहाजिक कोरेगाव मार्गे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण आला आहे. टँकर वाहतूक कोंडीत अडकू नयेत, यासाठी पंपधारकांनी विशेष खबरदारी घेतली आहे. (प्रतिनिधी)
हजारो तरुणांना बांधणार मोफत फेटे
कऱ्हाड : फेटा म्हणजे रुबाब आणि रुबाब म्हणजेच फेटा, असं समीकरण सांगितलं जातं. राजधानी साताऱ्यातही मराठा महामोर्चावेळी याच फेट्याचा रुबाब पाहायला मिळणार आहे. सध्या भगव्या फेट्याची मोठी क्रेझ असून, युवकांसह युवतीही फेटा परिधान करीत आहेत. अशातच महामोर्चाच्या दिवशी युवक-युवती, महिला व ग्रामस्थांना फेटे मोफत बांधून देण्याचा निर्णय काही फेटे स्पेशालिस्ट व्यावसायिकांनी घेतला आहे.
राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राची परंपरा तसेच मोर्चे, आंदोलने यातही कऱ्हाडचे नाव सातासमुद्रपार गेले आहे. सध्या मराठा क्रांती महामोर्चाचे वारे वाहत असताना त्याचे फक्कड नियोजनही कऱ्हाड तालुक्यातील बांधवांनी केले आहे. कुणी चारचाकी गाड्या तर कुणी मोर्चास येणाऱ्यांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे.
या महामोर्चात खासकरून युवक-युवतींचा वाढता सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे महामोर्चास कऱ्हाड तालुक्यातून जाणाऱ्यांना मोफत फेटे बांधण्याचा निर्णय तालुक्यातील अनेक फेटे स्पेशालिस्टनी घेतला आहे.
कऱ्हाड तालुक्यातून लाखोंच्या संख्येने भगव्या झेंड्याप्रमाणे भगवे फेटेधारी मोठ्या प्रमाणात मराठा क्रांती महामोर्चात सहभागी होणार असल्याने मोर्चा भगवेमय होणार यात शंका नाही. फेटा बांधल्याने वाढणारा रुबाब, अंगावर येणारे शहारे यातून क्रांती महामोर्चास वेगळे बळ मिळणार आहे. या महामोर्चाची चर्चा सध्या तालुक्यातील गावागावात, प्रत्येक चौकात केली जात आहे. मोर्चास भगवा फेटा बांधूनच जायचे, असा काहीनी चंगही बांधला आहे. ज्यांच्याकडे फेटा आहे. मात्र तो बांधता येत नाही, अशांना हे स्पेशालिस्ट मोफत फेटा बांधून देणार आहेत. (प्रतिनिधी)
२५ गावांमध्ये जनजागर अभियान
औंध : साताऱ्यात दि. ३ आॅक्टोबर रोजी मराठा समाजाचा क्रांती महामोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमीवर औंधसह परिसरात या महामोर्चाच्या नियोजनाची जय्यत तयारी सुरू आहे. गावागावांत, वाड्या-वस्त्यांवर बैठका सुरू आहेत. गोपूज येथे मराठा क्रांती मोर्चा संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले.
औंध येथील मराठा समाज बांधवांच्या वतीने मूक महामोर्चाच्या नियोजनासंदर्भात नुकत्याच बैठकीच्या दोन फेऱ्या पार पडल्या. यावेळी महामोर्चाचे अतिशय सूक्ष्मपणे नियोजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, युवकांनी आपले विचार मांडले. त्याचबरोबर शासनाने आमच्या रास्त मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असेही विचार मांडण्यात आले.
लोकसहभाग जास्तीत जास्त वाढावा यासाठी पुढील आठवडाभर औंध परिसरातील २५ गावांमध्ये जनजागरण अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कमिट्यांची स्थापना करण्यात आली. महामोर्चाला जाण्यासाठी आवश्यक वाहनांचे नियोजन, स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली. महामोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचना, आचारसंहिता यावेळी तयार करण्यात आली. महामोर्चाची सविस्तर माहिती, मार्ग नागरिक आणि महिलांना समजावा यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
दरम्यान गोपूज, वडी, गणेशवाडी, नांदोशी, त्रिमली, खबालवाडी, जायगाव, चौकीचा आंबा व परिसरातील गावागावांमध्ये मराठा मूक महामोर्चा नियोजनासंदर्भात बैठका सुरू असून, दिवसेंदिवस यामध्ये वाढ होऊ लागली आहे.
राज्यात ठिकठिकाणी झालेल्या मोर्चामुळे मराठा समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता तरी शासन आमच्या मागण्यांना न्याय देईल, असा आशावाद नागरिकांसह, तरुणाईमध्ये निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Alternative place for Pravai Naka Durga Mandap for the upper house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.