प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तळ्यांचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:39 AM2021-09-19T04:39:15+5:302021-09-19T04:39:15+5:30
सचिन काकडे गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी गणेश भक्तच नव्हे, तर प्रशासनही जबाबदारीने काम करत असते. उत्सव सुरू झाल्यापासून तो ...
सचिन काकडे
गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी गणेश भक्तच नव्हे, तर प्रशासनही जबाबदारीने काम करत असते. उत्सव सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचे नियोजन केले जाते. अलीकडच्या काही वर्षांत विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यांचा पर्याय महत्त्वाचा ठरू लागला आहे. जलप्रदूषण टाळण्यासाठी ही तळी महत्त्वाची भूमिका बजावत असली, तरी केवळ आणि केवळ नागरिकांच्या भावनेखातर प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च या तळ्यांवर करावा लागत आहे.
सातारा शहराचा विचार करायचा झाल्यास गेल्या अनेक वर्षांपासून येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दहा दिवसांच्या धामधुमीनंतर गणेशमूर्ती शहरातील ऐतिहासिक तळी, नदी अथवा विहिरींमध्ये विसर्जित केल्या जायच्या. मात्र पर्यावरणाची होणारी हानी व जलप्रदूषण टाळण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून नदी, विहिरी यांची जागा कृत्रिम तळ्यांनी घेतली. जुनी तळी विसर्जनासाठी बंद ठेवण्यात आली. काही तरी नागरिकांनी कचरा टाकून इतकी घाण केली की त्यांचा वापर भविष्यात होईल की नाही हे सांगता येत नाही.
गणेशोत्सव आला की कृत्रिम खेळांचे खोदकाम करणे, त्यात पाणीसाठा करणे, दीड, पाच दिवस सात व दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करणे असा प्रशासनाचा दिनक्रम सुरू होतो. सातारा शहरात दरवर्षी कृत्रिम तळ्यांवर सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचा खर्च केला जातो. गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर पालिकेला विसर्जन व्यवस्थेवर तब्बल दीड कोटींहून अधिक रुपये खर्च करावे लागले आहेत. इतक्या मोठ्या रकमेतून कायमस्वरूपी तळ्याचीदेखील उभारणी झाली असती. मात्र नागरिकांची, गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी दरवर्षी कृत्रिम तळ्यांची उभारणी करावी लागते. परंतु हे असं आणखी किती वर्षे चालणार आहे. विसर्जनासाठी नागरिकांनी, प्रशासनाने सक्षम पर्याय शोधायला हवा. अनेक नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाचा जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्तींचे तळ्यांमध्ये नव्हे, तर घरच्या घरी विसर्जन करण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे. ही चळवळ जर व्यापक झाली, तर अनेक प्रश्न आपोआपच सुटू शकतील.
(चौकट)
... तर कोट्यवधींचा खर्च वाचेल :
- जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून विहिरी, तलाव व नदीमध्ये मूर्तींचे विसर्जन केले जाते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे.
- मूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगामुळे जलप्रदूषण तर होतेच शिवाय जलचरांवरदेखील मोठा परिणाम होतो.
- हे रोखण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती कृत्रिम तळ्यांची उभारणी करत आहे. ठिकठिकाणी मूर्ती दान उपक्रमही राबविला जातो.
- केवळ प्रदूषण रोखणे हा यामागचा उद्देश असला, तरी नागरिकांच्या भावना दुखावू नयेत, यासाठी प्रशासनाला कृत्रिम तळ्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत
- मूर्तींचे आपण घरच्या घरी विसर्जन केले अथवा एकदा प्रतिष्ठापना केलेली मूर्ती तीन ते पाच वर्ष विसर्जित केली नाही, तर हा खर्च वाचू शकतो.
फोटो : जावेद खान