आई-वडिलांची पाटी कोरी, मुलाने घेतली 'चार्टड अकाऊंटंट'पदी भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 03:10 PM2021-12-02T15:10:56+5:302021-12-02T15:14:07+5:30

सागर चव्हाण पेट्री : सातारा तालुक्यातील लहानशा दुर्गम, डोंगरभागातील जांभळमुरे गावातील शेती, म्हशीपालन व बकरी पालन करणाऱ्या अशिक्षित दाम्पत्याच्या ...

Although his parents were uneducated Sunil Jambhale from Satara taluka passed the CA examination | आई-वडिलांची पाटी कोरी, मुलाने घेतली 'चार्टड अकाऊंटंट'पदी भरारी

आई-वडिलांची पाटी कोरी, मुलाने घेतली 'चार्टड अकाऊंटंट'पदी भरारी

googlenewsNext

सागर चव्हाण

पेट्री : सातारा तालुक्यातील लहानशा दुर्गम, डोंगरभागातील जांभळमुरे गावातील शेती, म्हशीपालन व बकरी पालन करणाऱ्या अशिक्षित दाम्पत्याच्या मुलाने प्रयत्न, चिकाटी, जिद्द, कष्टाच्या जोरावर दिवसभरात बारा-पंधरा तास अभ्यास करून सीएपरीक्षा उत्तीर्ण होत परिस्थितीची जाणीव ओळखून आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक केले. आई-वडिलांची मुळाक्षरांची पाटी कोरी असताना मात्र सुनीलच्या कोऱ्या पाटीवर उत्तम संस्कारातून ‘सीए’ हा शब्द सुवर्ण अक्षरात कोरला गेला.

सुनीलचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा जांभळमुरे व पेट्री बंगला तर माध्यमिक शिक्षण आदर्श विद्यालय पेटेश्वरनगर, वाणिज्य शाखेतून शिक्षण धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात झाले. वाचन व लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करून दाखविण्याचा ध्यास असणारा सुनील अखेर आठव्या प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण झाला. दरम्यान, अनेकविध अडचणींना सामोरे जाऊन यशाचे उत्तुंग शिखर गाठल्यानंतर त्याच्या आनंदाश्रूंना बांध घालता येत नव्हता.

सुनीलने वाचनावर जास्त भर देऊन लायब्ररीमध्ये जेवणाचा डबा घेऊन तासनतास बसायचा. प्रॅक्टिकल, अकांऊटवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत दररोज बारा-पंधरा तास अभ्यास करून आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही प्रतिकूल परिस्थितीवर इच्छाशक्तीने मात केली. आईवडील, भाऊ, वहिनी, मार्गदर्शक शिक्षकाचा सीए बनण्यामागे मोलाचा वाटा असून शालेय जीवनात शिक्षकांनी खूप प्रोत्साहन दिल्याचे सुनीलने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बालपणापासून बुद्धिमत्तेची चुणूक दाखवणाऱ्या सुनीलने दहावीत प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर एखाद्या वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होत असताना आई-वडिलांच्या कष्टातून तसेच भाऊ वहिनीचे मार्गदर्शन व प्रेरणेतून शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीची जाणीव ओळखून आहे. त्यात समाधान मानत २०१२ मध्ये सीपीटी; २०१४ मध्ये आयपीसीसी परीक्षा उत्तीर्ण झाला.

२०१४ मध्ये सीए फायनलला प्रवेश घेऊन आलेल्या अपयशात न खचता जिद्दीने अभ्यासाच्या प्रयत्नात सातत्य ठेवून २०१९ मध्ये सीए फायनलचा पहिला. २०२१मध्ये दुसरा ग्रुप पास होऊन अखेर आई-वडील, भाऊवहिनीचे स्वप्न सत्यात उतरवण्यात तो यशस्वी झाला.

सुनीलने अत्यंत खडतर प्रवासातून मिळवलेल्या यशाचे कौतुक असून त्याच्या यशाचा अभिमान आहे. डोंगरभागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेतून गावाचे, देशाचे नाव उज्ज्वल करावे. सुनीलच्या यशाने नव्यापिढीसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. -जगन्नाथ जांभळे, वडील

बहुतांशी तरुण शिक्षण अर्धवट सोडून रोजगारासाठी शहराची वाट धरतात; परंतु शिक्षण महत्त्वपूर्ण असून, आपल्या करिअरकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच करिअर घडविण्यासाठी वेळीच तरुणांना योग्य मार्गदर्शन होण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे. -सुनील जांभळे, चार्टड अकाऊंटंट

Web Title: Although his parents were uneducated Sunil Jambhale from Satara taluka passed the CA examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.