अंबवडे बुद्रुक बनतंय किल्ल्यांचं गाव ! इतिहासाचे जतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 12:13 IST2020-11-19T12:10:52+5:302020-11-19T12:13:47+5:30
fort, Mahabaleshwar Hill Station, sataranews महाबळेश्वर तालुक्यातील भिलार पुस्तकांचं गाव, किकली विरगळांचं अन् जकातवाडी कवितेचं गाव म्हणून नावारुपास येत असताना सातारा तालुक्यातील अंबवडे बुद्रुक हे गावही किल्ल्यांचं गाव म्हणून ओळख दृढ करू लागलं आहे. इतिहासाचे मूक साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी या गावात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गड-किल्ले बनविले जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून येथील तरुणांनी ही परंपरा जोपासली आहे.

अंबवडे बुद्रुक बनतंय किल्ल्यांचं गाव ! इतिहासाचे जतन
अक्षय सोनटक्के
परळी : महाबळेश्वर तालुक्यातील भिलार पुस्तकांचं गाव, किकली विरगळांचं अन् जकातवाडी कवितेचं गाव म्हणून नावारुपास येत असताना सातारा तालुक्यातील अंबवडे बुद्रुक हे गावही किल्ल्यांचं गाव म्हणून ओळख दृढ करू लागलं आहे. इतिहासाचे मूक साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी या गावात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गड-किल्ले बनविले जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून येथील तरुणांनी ही परंपरा जोपासली आहे.
साताऱ्यात अनेक गड-किल्ले आहेत ते आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभे आहेत. हेच अस्तित्व राखण्यासाठी जतन करण्यासाठी अंबवडे बुद्रुक येथील ग्रामस्थ गेल्या आठ वर्षांपासून दिवाळीत गड-किल्ल्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या अंबवडे बुद्रुक या गावात २०१२ पासून म्हणजे गड-किल्ल्यांची स्पर्धा भरवली जाते. गावात दरर्षी ३० ते ४० किल्ल्यांच्या प्रतिकृती उभ्या केल्या जातात. यंदाही गावात जवळपास ४० गड-किल्ले उभारण्यात आले आहेत. राजगड, रायगड, तोरणा अन् सज्जनगडाची प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
किल्ले बनविण्यासाठी दगड, माती, शेण, राख अशा सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. पर्यावरण संतुलन राखावे, यासाठी किल्ल्यावर उभारण्यात आलेले सैन्यही कागदापासून तयार करण्यात आले आहे. इतिहासाचे संवर्धन करण्याबरोबरच मुलांमध्ये शिवरायांचे विचार रुजण्यासाठी किल्ले बनविण्याची परंपरा अखंडपणे सुरूच ठेवणार असल्याचे निर्धार येथील तरुणांनी केला आहे.
एक गुंठे क्षेत्रात उभारणी
सातारा जिल्ह्यातील गडप्रेमींना आंबवडे येथे प्रतापगड, रामशेज, तोरणा, जंजिरा, विजयदुर्ग, सज्जनगड, रायगड, राजगड यांसारख्या कित्येक गडकिल्ले पाहायला मिळत आहे. तब्बल एक ते दोन गुंठे क्षेत्रात साकारलेल्या किल्यांची भव्य-दिव्य प्रतिकृती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.