आंबेडकर शाळा प्रवेश दिन राज्यभर साजरा होणार
By Admin | Published: August 28, 2016 12:05 AM2016-08-28T00:05:49+5:302016-08-28T00:05:49+5:30
राजकुमार बडोले : प्रतापसिंह हायस्कूलला भेट; रजिस्टरमधील नाव अन् सही पाहून भारावले
सातारा : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन म्हणून दि. ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यभर साजरा केला जाईल. तसेच याची देशात कशी अंमलबजावणी करता येईल, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू,’ अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. त्यांच्या या घोषणेने परिवर्तनवादी चळवळीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण सातारा येथे गेले. दि. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये (त्यावेळचे सातारा हायस्कूल) पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. हा दिवस ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन’ म्हणून ‘प्रवर्तन’चे अध्यक्ष अरुण जावळे पंधरा वर्षांपासून साजरा करतात. ७ नोव्हेंबर हा दिवस राज्य सरकारने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन’ म्हणून घोषित करावा, यासाठी ते अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. काही महिन्यांपूर्वीच सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी चर्चा झाली होती. मंत्री बडोले शुक्रवारी साताऱ्यात आले असताना त्यांनी छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलला भेट दिली. अरुण जावळे यांचे निवेदन हातात घेऊन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन’ राज्यभर साजरा करण्याबाबत निश्चय व्यक्त केला.
मंत्री बडोले म्हणाले, ‘जातविरहित, धर्मविरहित समाजरजना निर्माण व्हावी आणि समता स्वातंत्र्याबरोबरच न्याय, बंधुता ही मूल्य भारतीय समाजात रुजावी, यासाठी प्रभावशाली असे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या राष्ट्राला दिले. महामानवाचे बालपण साताऱ्यात गेले आणि या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले, ही बाब अभिमानास्पद आहे. ज्या मातीत आंबेडकरांची पावले उमटली, त्या शाळेत मला उभे राहण्याची व बोलण्याची संधी मिळत आहे, हा माझा बहुमान आहे. ही शाळा प्रेरणादायी आहे, कारण या शाळेत शिकलेले डॉ. आंबेडकर हे जगाच्या पाठीवरचे अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहे.’ (प्रतिनिधी)
रजिस्टरची मिळविली दुसरी प्रत
मंत्री बडोले हे तब्बल दीड तास शाळेत रमून गेले. रजिस्टरला असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तसेच त्यांची सही त्यांनी कुतूहलाने पाहिली. रजिस्टरकडे बराच वेळ पाहत व त्यावरून हात फिरवत हा ठेवा खूपच अनमोल असल्याची भावना व्यक्त केली. तसेच या रजिस्टरची एक प्रत मिळावी, अशी मनापासून विनंतीही केली. यावेळी शाळा प्रशासनाने तत्काळ प्रत उपलब्ध करून दिली.