आंबेदरेची रिक्षा ठरली लोणावळ्यात अव्वल!
By admin | Published: April 12, 2017 10:49 PM2017-04-12T22:49:42+5:302017-04-12T22:49:42+5:30
साताऱ्याचा नावलौकिक : रिक्षा फॅशन शोमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
सातारा : आंबेदरे (ता. सातारा) येथील विजय शिवाजी निकम यांच्या रिक्षाला लोणावळा रिक्षा फेडरेशन, ता. मावळ, जि. पुणे यांच्या वतीने लोणावळा येथे रविवारी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य भव्य रिक्षा फॅशन शोमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
या स्पर्धेत पुणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, लोणावळा या विभागांतील शेकडो रिक्षा प्रेमींनी सहभाग घेतला होता. सातारा शहरात रिक्षा व्यवसाय करणाऱ्या विजय निकम यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला. निकम यांना रिक्षा सजावटीची आवड आहे. साताऱ्यात रिक्षा सजावटीसाठी व वेगळेपणासाठी ते पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे दहा रुपयांचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह त्यांना मिळाले.
लोणावळा येथे झालेल्या स्पर्धेत रिक्षाला लावलेले सिंबॉल, मोनोग्राम, पेपर वाचनालय, प्रथमोपचार पेटी, लॅपटॉप, शुद्ध पाण्याची सोय या बाबींचा विचार करून संयोजकांनी त्यांच्या रिक्षाला प्रथम क्रमांक दिला.
नेहमीचा व्यवसाय करतानाही विजय निकम यांच्या रिक्षाचा असा ‘हटके लूक’ कायम असतो. त्यामुळे साहजिकच त्यांची रिक्षा सातारा शहरात ‘फेमस’ आहे. सातारा-आंबेदरे या कच्च्या रस्त्यावर नेहमी चालवूनही त्यांची रिक्षा कायमच स्वच्छ आणि नेटकी असते. लोणावळ्यात झालेल्या स्पर्धेसाठी त्यांना काका जाधव, संतोष बाबर, संजय कोकरे यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)