आंबेवाडीच्या आरोपीला मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा; बोरगाव येथील घटना

By नितीन काळेल | Published: June 14, 2024 09:42 PM2024-06-14T21:42:46+5:302024-06-14T21:43:08+5:30

दारुच्या बाटल्या फोडून काचा कशाला करतो असे म्हटल्याने चिडून एकाने तिघांवर चाकूने वार केले.

Ambewadi accused sentenced to 10 years for causing death | आंबेवाडीच्या आरोपीला मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा; बोरगाव येथील घटना

आंबेवाडीच्या आरोपीला मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा; बोरगाव येथील घटना

सातारा : दारुच्या बाटल्या फोडून काचा कशाला करतो असे म्हटल्याने चिडून एकाने तिघांवर चाकूने वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आंबेवाडी, ता. सातारा येथील विशाल प्रल्हाद शितोळे याला मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी १० वर्षे सश्रम कारावास आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना सातारा तालुक्यातील बोरगाव येथे घडली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १३ आॅगस्ट २०१८ रोजी बोरगाव येथील पुलाच्या खाली हा प्रकार घडला होता. आरोपी विशाल शितोळे (वय २९) याला दारुच्या बाटल्या फोडून काचा कशाला करतो असे म्हटले होते. यावरुन चिडून त्याने दीपक नामदेव साळुंखे, अनिल शंकर देशमुख तसेच विजय तातोबा साळुंखे (तिघेही रा. बोरगाव) यांच्यावर चाकूने वार केले होते. यामध्ये तिघेही जखमी झालेले. तर यामधील विजय साळुंखे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा नोंद झाला होता.

बोरगाव ठाण्याचे तत्कालिन सहायक पोलिस निरीक्षक संतोष चाैधरी यांनी गुन्ह्याचा तपास करुन जिल्हा न्यायलयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा निकाल लागला आहे. परिस्थितीजन्य पुरावा, साक्षीदारांची साक्ष, सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद आदी पुरावे ग्राह्य धरुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी आरोपी विशाल शितोळे याला शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता वैशाली पाटील यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. तर या खटल्यात ११ साक्षीदार तपासण्यात आले.

पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक आर. जी. तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस फाैजदार विजय देसाई, सुनीता देखणे यांनी काम पाहिले. प्राॅसिक्यूशन स्काॅडचे पोलिस उपनिरीक्षक सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फाैजदार शशिकांत गोळे, हवालदार गजानन फरांदे, रहिनाबी शेख, राजेंद्र कुंभार, अमित भरते यांनी सहकार्य केले.

Web Title: Ambewadi accused sentenced to 10 years for causing death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.