संचारबंदीमुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 07:27 PM2020-05-29T19:27:56+5:302020-05-29T19:29:31+5:30
बहुचर्चित वैद्यकीय महाविद्यालासाठी शासनाकडून जागा निर्धारित करण्यात आली. पुढे निधीची घोषणाही झाली. परंतु हे महाविद्यालय कधी पूर्णत्वास येणार, याचे उत्तर अनुुत्तरित आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील महात्वाकांक्षी प्रकल्प रखडले असून, भविष्यात त्यांच्या कामाचे बजेटही वाढणार आहे.
सचिन काकडे।
सातारा : शासनाने नोकरभरतीसह नव्या कामांना स्थगिती दिल्याने याचा परिणाम साताऱ्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर झाला आहे. कास धरण, ग्रेड सेपरेटर, भुयारी गटार या योजनांचा कामांना ब्रेक लागला असून, सातारा पालिकेची नूतन प्रशासकीय इमारत अन् वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचे स्वप्न यंदाही अधांतरीत राहण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.
लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने राज्याचा कारभार पूर्णत: ठप्प झाला आहे. शिवाय विविध मार्गांनी राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होणारा महसूलही बंद झाला आहे. कोरोनावरील उपचाराचा खर्च वाढत चालल्याने सरकारचा कारभार काटकसरीने सुरू झाला आहे. हे करीत असताना सरकारने नोकरभरती, नवीन कार्यक्रम व नव्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. याचे परिणाम साताºयातील सध्या सुरू असलेल्या व नियोजित प्रकल्पांवर झाला आहे.
सातारा पालिकेच्या माध्यमातून कास धरणाच्या उंची वाढीचे व भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. ही कामे गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प आहेत. ग्रेड सेपरेटरचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण आहे. परंतु उर्वरित कामही लॉकडाऊनमुळे ठप्प पडले आहे. सातारा शहराच्या वैभवात भर घालणाºया नूतन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव पालिकेने मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला आहे. मात्र, या कामाला यंदा मुहूर्त लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुचर्चित वैद्यकीय महाविद्यालासाठी शासनाकडून जागा निर्धारित करण्यात आली. पुढे निधीची घोषणाही झाली. परंतु हे महाविद्यालय कधी पूर्णत्वास येणार, याचे उत्तर अनुुत्तरित आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील महात्वाकांक्षी प्रकल्प रखडले असून, भविष्यात त्यांच्या कामाचे बजेटही वाढणार आहे.
कास धरणाच्या उंचीवाढीचे काम १ मार्च २०१८ पासून हाती घेण्यात आले. मार्च २०२१ पर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, पुढील टप्प्यात मुख्य विमोचक, नवीन सांडवा, फॉल स्ट्रक्चर्स आणि कासकडे जाणारा पर्यायी रस्ता ही कामे केली जाणार आहेत. धरणात सध्या १०७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होत असून, काम पूर्णत्वास आल्यानंतर ५०० दशलक्ष घनफूट म्हणजेच अर्धा टीएमसी पाणीसाठा होणार आहे.
आठ रस्ते एकत्र जोडणाऱ्या पोवई नाक्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी दि. ८ मार्च २०१८ पासून ग्रेड सेपरेटरचे (भुयारी मार्ग) काम सुरू झाले. हे काम जवळपास ८० टक्के पूर्णत्वास आले असून, गोडोलीकडे जाणाºया मार्गाचे काम वाढल्याने या प्रकल्पाचे बजेट ६० कोटींवरून ७५ कोटींवर गेले आहे. भुयारी मार्गातील डांबरीकरण, विद्युतीकरण, रंगरंगोटी अशी कामे पूर्णत्वास आली आहे.
शासनाकडून भुयारी गटार योजनेच्या पूर्णत्वासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम संथ गतीने सुरू असून, आजवर केवळ ३० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. कूपर कॉलनी, बुधवार नाका, व्यंकटपुरा पेठ, मंगळवार पेठ, करंजे आदी ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. आधीच संथ गतीने सुरू असलेले हे काम कोरोनामुळे पूर्णत: ठप्प झाले आहे.
सातारा पालिकेच्यावतीने सदर बझार येथे तब्बल ६३ हजार चौरस फूट क्षेत्रात भव्य-दिव्य अशी प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. तीन वाहनतळ, सुसज्ज सभागृह, आॅर्ट गॅलरी, नगराध्यक्ष, सभापतींसाठी स्वतंत्र दालन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॅनल अशा सर्व सोयी-सुविधांचा अंतर्भाव या इमारतीत केला जाणार आहे. पालिकेने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असला तरी यंदा या कामाला हिरवा कंदील मिळणार नाही.
साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न गेल्या सात वर्षांपासून चर्चेत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा खोरे विभागाची २५ एकर जागा महाविद्यालयासाठी देण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न सोडविण्याची घोषणा केली. मात्र, कोरोनामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.