रुग्णवाहिकेचा स्फोट, चौघे बचावले
By admin | Published: September 1, 2015 09:53 PM2015-09-01T21:53:22+5:302015-09-01T21:53:22+5:30
नेलकरंजीजवळ घटना : बचावलेले कऱ्हाड, पाटण तालुक्यातील
नेलकरंजी (जि. सांगली) : कऱ्हाड-पंढरपूर राज्य मार्गावर नेलकरंजी (ता. आटपाडी) गावानजीक रुग्णवाहिकेतील गॅस सिलिंडरच्या गळतीने भीषण स्फोट झाला. सिलिंडर गळती होत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने सर्वांना तातडीने उतरविल्याने गाडीतील चौघांचे प्राण वाचले. ही घटना मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. कऱ्हाड येथील रुग्णवाहिका (एमएच ५०-८३९) पहाटे तीन वाजता पंढरपूरला निघाली होती. भिवघाटमध्ये आल्यावर म्हसोबा मंदिरानजीक चालक गणेश महादेव पवार (रा. तांबवे, ता. कऱ्हाड) यास गाडीमध्ये गॅस गळतीचा वास येत असल्याची शंक ा आल्याने त्याने गाडी थांबविली; पण गाडीतील दोघांनी पंढरपूरला जाऊन पाहू, असे सांगितल्याने ते पुढे निघाले. त्यानंतर नेलकरंजी येथील कालव्याजवळ आल्यावर गॅसचा जास्तच वास येऊ लागल्याने चालक पवार याने गाडी बाजूला घेतली.
चालकाने गाडीतील सागर लक्ष्मण माळी, गौरव पवन परदेशी, सोमनाथ पवन परदेशी (सर्व रा. तारवे, ता. पाटण) यांना बाहेर काढले व दूर धाव घेतली. त्यानंतर दोन मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट झाले. चालकाच्या चाणाक्षपणामुळे या गाडीतील चौघांचे प्राण वाचले. रुग्णवाहिका पंढरपूरला निघाली होती. स्फोट इतका भीषण होता की, गाडीचे सुटे भाग पाचशे फुटांपर्यंत जाऊन पडले व गाडी जळून खाक झाली.
गाडीच्या स्फोटाच्या आवाजाने ग्रामस्थ धावले. याबाबत कऱ्हाड आणि तासगाव येथील अग्निशमन दलाला कळविण्यात आल्यानंतर त्या गाड्यांनी याठिकाणी येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)
अत्याधुनिक रुग्णवाहिका
या घटनेत खाक झालेली रुग्णवाहिका अत्यंत अत्याधुनिक आणि सर्वसोयींनीयुक्त अशी
होती. तिच्यात शस्त्रक्रियेची खास सोय होती. संपूर्ण वातानुकूलित असलेली ही रुग्णवाहिका घेऊन हे चौघेजण पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन मंगळवारी सायंकाळी रुग्ण घेऊन दिल्लीला जाणार होते.
...अन् रुग्णवाहिका हवेत उडाली!
मंगळवारी पहाटे रात्रीच्या गस्ती पथकात असणाऱ्या पोलिसांना या रुग्णवाहिकेने घाटात ओव्हरटेक केले होते. हे सर्वजण भिवघाट येथे चहा घेण्यासाठी थांबले असतानाच तेथे एका टेम्पोचालकाने घटनेची माहिती दिल्यानंतर गस्ती पथकातील सर्व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गाडीपासून अवघ्या १५ ते २० फुटांवर असताना रुग्णवाहिकेचा चालक पवार याने गाडीत असलेल्या सिलिंडरबद्दल ओरडून माहिती दिली. त्यावेळी तातडीने पोलिसांनी पोलीस गाडी तीनशे ते चारशे फुटांपर्यंत मागे घेतली. त्याचवेळी अन्य तीन सिलिंडरचा स्फोट होऊन रुग्णवाहिका दोनशे फूट हवेत उडाली.