महामार्गावर सांडलेल्या मळीवरून घसरल्याने रुग्णवाहिका पलटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:39 AM2021-05-26T04:39:31+5:302021-05-26T04:39:31+5:30
मलकापूर : महामार्गावर पडलेल्या मळीवरून भरधाव वेगात जाणारी रुग्णवाहिका घसरून चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गाच्या दुभाजकाला धडकली. यामध्ये चालक किरकोळ ...
मलकापूर : महामार्गावर पडलेल्या मळीवरून भरधाव वेगात जाणारी रुग्णवाहिका घसरून चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गाच्या दुभाजकाला धडकली. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला असून, रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात पुणे-बंगळूर अशियायी महामार्गावर येथील नटराज सिनेमागृहासमोर मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला. गणेश जगताप (वय ३५ रा.कार्वे, ता.कऱ्हाड) असे जखमी चालकाचे नाव आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुल मोहिते याच्या मालकाची रुग्णवाहिका कऱ्हाडकडून कृष्णा रुग्णालयाच्या दिशेने मृतदेह आणण्यासाठी भरधाव निघाली होती. नटराज सिनेमागृहाजवळ आली असता, महामार्गावर पडलेल्या मळीवरून घसरली. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने रुग्णवाहिका महामार्गाच्या लोखंडी दुभाजकाला धडकली. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला, तर रुग्णवाहिकेचे नुकसान झाले. चालकाला नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातामध्ये लोखंडी दुभाजक तुटून महामार्गावर पडले. अपघातानंतर सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे वाहतूक पोलीस, महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, मलकापूर पालिकेचे कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन बाजूला केले.
चौकट
नंबरप्लेटसह रेडियम काढले
पोलिसांनी कऱ्हाड पालिकेच्या अग्निशमन दल व मलकापूर पालिकेच्या पाणी टँकरच्या साहाय्याने रस्त्यावरील मळी बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली. गाडीचा नंबर प्लेट व गाडीवरील रेडियम खरडून काढण्यामागे नेमके कारण काय, अशी घटनास्थळी चर्चा होती.