सातारानजीक लिंबच्या पेरूसाठी अमेरिकन प्राध्यापकाची धडपड, लोकांच्या परसबागेत वाढत आहेत कलमे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 02:06 PM2018-01-27T14:06:39+5:302018-01-27T14:15:24+5:30
सातारानजीक असणारा लिंबचा पेरू नामशेष होण्याच्या मार्गावर असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तोे देश-विदेशात पोहोचला आहे. या दुर्मीळ पेरूला वाचविण्यासाठी एका अमेरिकन मराठी प्राध्यापकाने पुढाकार घेतला असून पेरूची छाट कलमे करून राज्यभरात त्यांनी आपल्या मित्रांच्या परसबागेत वाढवण्याचे काम सुरू केले आहे.
सातारा : सातारानजीक असणारा लिंबचा पेरू नामशेष होण्याच्या मार्गावर असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तोे देश-विदेशात पोहोचला आहे. या दुर्मीळ पेरूला वाचविण्यासाठी एका अमेरिकन मराठी प्राध्यापकाने पुढाकार घेतला असून पेरूची कलमे करून राज्यभरात त्यांनी आपल्या मित्रांच्या परसबागेत वाढवण्याचे काम सुरू केले आहे.
सातारा तालुक्यातील लिंब गाव हे ऐतिहासिक बारा मोटाच्या विहिरीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर लिंबमध्ये पिकणारा चविष्ट आणि दर्जेदार पेरुही एकेकाळी प्रसिद्ध होता. छत्रपती प्रतापसिंह (थोरले) महाराजांनी या गावात पेरूच्या बागा लावल्या होत्या. सातारचे राजघराणे इतर राजांना नजराणा म्हणून लिंबचे पेरू भेट देत असत. त्याची चव आणि रंगामुळे सुमारे दोनशे वर्षांपासून लिंबचा पेरू देश-विदेशात जात होता. त्यामुळे गावात साधारण शंभर एकर परिसरात पेरूच्या बागा होत्या.
अनेकांना पेरूच्या विक्रीतून चांगले पैसे मिळत होते. मात्र, गेल्या काही दशकांत ऊस शेतीमुळे शेतकऱ्यांनी पेरूच्या बागा काढून उसाची लागवड केली. परिसरात हळूहळू ऊस वाढू लागल्याने लोकरी मावा, फळमाशी आदी रोग पेरूवर पडू लागले. उत्पादन घटल्याने हळूहळू पेरूच्या बागा कमी-कमी होत गेल्या अन् हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच झाडे शिल्लक राहिली.
साताऱ्याचे हे वैभव नष्ट होत असताना रवींद्र वर्णेकर, संजय कोल्हटकर आदी मंडळींनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली. त्याचबरोबर इतरांनाही हा देशी पेरू वाचवण्याचे आवाहन केले. सोशल मीडियाद्वारे ही माहिती देश-विदेशात पोहोचण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, अमेरिकेत स्थायिक झालेले प्राध्यापक मिलिंद रानडे यांनी ही पोस्ट वाचली. त्यांनी त्याबाबत महाराष्ट्रातील काही मित्रांशी संपर्क साधून लिंबचा पेरू वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची योजना आखली. त्यानुसार डिसेंबरमध्ये प्राध्यापक रानडे लिंबमध्ये पोहोचले. त्यांनी लिंबमध्ये शिल्लक असलेल्या पेरूची झाडे पाहिली.
ती वाचवण्यासाठी रवींद्र वर्णेकर यांच्या मदतीने गुटी कलमे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य नसल्याने त्यांनी फांद्या छाटून छाट कलमे करण्यास सुरुवात केली. प्राथमिक स्तरावर रानडे यांनी देशातील विविध ठिकाणी शाश्वत ग्रामविकासावर काम करणाऱ्या लोकांना लिंबच्या पेरूची कलमे दिली. आजच्या घडली दापोली, जव्हार, पालघर, औरंगाबाद, पुणे, मुंबईत राहणाऱ्यां काही लोकांच्या परसबागेत लिंबच्या पेरूची कलमे वाढत आहे.
सातारा, वाई व महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात जैव विविधता आहे. या भागात अनेक दुर्मीळ झाडे व वनस्पती आहे. तिचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लिंबच्या पेरूची कलमे करून सर्वत्र पोहोचविण्याचे काम करणार आहे.
प्रा. मिलिंद रानडे
औधषी गुणधर्म
लिंबच्या पेरु हा चवीला अतिशय गोड असतो. त्याचा रंग पारंपरिक हिरवा व काहीसा गुलाबी असतो. त्याच्या पानात अलौकिक औषधी गुण आहेत. पचनसंस्था सुरळीत करण्यासाठी व नशेचा प्रभाव कमी करण्यासाठी सातारकर या पेरूच्या पानांचा वापर करत असतात.