पाटणमध्ये आमसभा पडद्याआड; मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्याची भीती
By admin | Published: March 1, 2015 08:54 PM2015-03-01T20:54:50+5:302015-03-03T00:48:06+5:30
मागच्या खेपेस आमसभेचे नियोजन पाटणच्या बचत गटामध्ये केले. मात्र, सभा सुरू होतानाच देसाई-पाटणकर गट हातघाईवर आला.
पाटण : जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी वर्षातून एकदा आमसभेचे नियोजन असते. मात्र, पाटणला ग्रामसभा घ्यायची म्हणजे मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्याचा अनुभव २००५ साली येथील जनतेला आला. तेव्हापासून आजअखेर आमसभेचे नाव घ्यायला कुणी तयार नाही. त्यामुळेच आमसभेचा अपवाद पाटण तालुक्याला असून, आमसभेचे नियोजन करावे किंवा करू नये यातूनच जणू तालुका वगळला की काय, अशी चर्चा जनतेत सुरू आहे. आम जनतेचे प्रश्न आमदार, खासदार व गावकऱ्यांनी ऐकावेत यासाठी पंचायत समितीने आमसभेचे नियोजन करण्याचे असते. पण, त्याचं असं झालयं की, मागच्या खेपेस आमसभेचे नियोजन पाटणच्या बचत गटामध्ये केले. मात्र, सभा सुरू होतानाच देसाई-पाटणकर गट हातघाईवर आला. त्यांची भांडणं सोडविण्यासाठी त्यावेळच्या लोकप्रतिनिधींना व पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. तेव्हापासून आमसभेचे नाव काढायला कुणीही तयार नाही. सध्या पाटणची आमदारकी शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. तर पाटण पंचायत समितीचे सभापतीपद माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाच्या ताब्यात आहे. त्यामुळेच पाटणची आमसभा होईलच याची शाश्वती नाही. २००५ साली देखील आमदार देसाई व पंचायत समितीचे सभापती सत्यजित पाटणकर अशी स्थिती होती. त्या दरम्यान आमसभा बोलविली गेली; मात्र जनहिताचे प्रश्न बाजूला राहिले आणि आमसभेचा आखाडा झाला. (वार्ताहर)
चांगला संदेश जाईल...
आमसभा झालीच पाहिजे, अशी सक्ती नसली तरी लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीत आमसभा होते. हे प्रतिष्ठेचे आणि कार्यत्परतेचे लक्षणे मानले जाते. त्यामुळे यापुढे पाटणची आमसभा आयोजित झाल्यास तालुक्यातील जनतेमध्ये एक चांगला संदेश पोहोचेल.