राष्ट्रवादी नेत्यांच्या रडारवर अमित कदम
By Admin | Published: July 5, 2017 02:20 PM2017-07-05T14:20:06+5:302017-07-05T14:20:06+5:30
जावळी तालुका : पक्षात खांदेपालट; कोयना विभागाला प्राधान्य, तालुकाध्यक्षपदी राजेंद्र संकपाळ
सायगाव : काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली. मात्र, राष्ट्रवादीचेच माजी शिक्षण सभापती अमित कदम यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे तालुक्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. नेमक्या याच कारणामुळे राष्ट्रवादी पक्षाने तालुक्याचा पक्षाचा कारभारी बदलून अमित कदम यांच्याच कोयना विभागाला तालुकाअध्यक्षपद दिले आहे. बामणोलीचे माजी सरपंच राजेंद्र संकपाळ यांना पद देऊन कदम यांचा कोयना हा बालेकिल्लाच उध्वस्त करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने चालवला आहे, असे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जावळी तालुका हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला राहिला आहे. यामध्ये कोयना विभागात शिवसेना मजबूत असतानाही आमदार शशिकांत शिंदे यांनी कोयनेतील बाबुराव संकपाळ यांना तालुकाध्यक्ष करून कोयनेत राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न केला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली तरी देखील भाजपने कुडाळ गटावर विजय मिळवला तर दोन गटात भाजपने दुसऱ्या क्रमांकावर राहून राष्ट्रवादीला कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. अमित कदम यांच्या भाजप प्रवेशामुळे एकाकी झुंज देणाऱ्या दीपक पवार यांना देखील कदम यांची ताकद मिळाल्यामुळे भाजपचे कमळ तालुक्यात चांगलेच फुललेले पाह्यायला मिळाले.
त्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांची अस्वस्थता चांगलीच वाढली. जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या रडारवर एकमेव अमित कदम हेच होते. त्यामुळे त्यांनी कदम यांच्याच कुसुंबी गटात अधिक लक्ष देऊन या गटातील तिन्ही जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करून अमित कदम यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कुसुंबी गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा मात्र निसटता विजय झाला होता.
दीपक पवार यांच्यापेक्षा अमित कदम यांनाच राष्ट्रवादी नेत्यांनी अधिक टार्गेट केले आहे. त्यादृष्टीनेच राष्ट्रवादीचा कारभारी बदलून अध्यक्षपदाची संधी कोयना विभागाला देण्यात आली आहे. या पदासाठी अनेक इच्छुक होते. यामध्ये ज्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली होती अशा कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता. मात्र, कोयना विभागातील बामणोलीचे राजेंद्र संकपाळ यांना तालुकाध्यक्षपद देऊन अमित कदम यांना त्यांच्याच विभागात खच्चीकरण करण्याचा डाव राष्ट्रवादीने आखला आहे. त्यामुळे नूतन अध्यक्ष संकपाळ यांना आता पक्ष वाढीसाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार हे निश्चित आहे. तसेच कोयना विभागात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
भाजपच्या त्रिदेवांनी मोट बांधण्याची गरज...
कधी नव्हे ते जावळीत भाजपची ताकद वाढलेली आहे. यापूर्वी दीपक पवार एकटे खिंड लढवत होते. मात्र, आता माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी शिक्षण सभापती अमित कदम यांची त्यांना साथ मिळाली आहे. तर मेढा नगरपंचायत नगरसेवक विकास देशपांडेंसारखे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते बरोबर घेऊन भाजपच्या या त्रिदेवांनी पक्ष वाढीसाठी मोट बांधण्याची गरज आहे. आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून काम केल्यास पक्ष आणखी मजबूत होऊ शकतो.
राष्ट्रवादीकडून दुसऱ्यांदा कोयनेला संधी...
यापूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांनी बाबुराव संकपाळ यांना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पद देऊन प्रथम कोयनेत पद देत कोयना विभागाचा सन्मान केला होता. तर यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजेंद्र संकपाळ यांना पक्षाचे तालुकाध्यक्ष पद देऊन कोयना विभागाला दुसऱ्यांदा प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे.