‘ब्युटिफुल साताऱ्या’त अखेर अमिताभ बच्चन येणार!
By admin | Published: March 30, 2016 10:13 PM2016-03-30T22:13:49+5:302016-03-31T00:08:35+5:30
शहेनशहा’ला भेटले ‘राजे’ : एकाच स्फटिकापासून तयार केलेली शाही तलवार दिली भेट
सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून सातारकरांना ज्याची प्रतीक्षा होती, ती आता पूर्ण होणार आहे. छत्रपती घराण्याचा ‘शिवसन्मान’ हा मानाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांनी साताऱ्यात येण्याचा शब्द दिला आहे. कला क्षेत्रातील या ‘शहेनशहा’ला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी याबाबतचे अधिकृत निमंत्रणही दिले.
मुंबईच्या जुहू येथील ‘जलसा’जवळील ‘जनक’ या दुसऱ्या बंगल्यात उदयनराजे यांनी अमिताभ यांची भेट घेतली. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले फाउंडेशन आॅफ कल्चरल अॅक्टिव्हिटी आणि पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमी आयोजित ‘सातारा गौरव पुरस्कार’ अंतर्गत देण्यात येणाऱ्या ‘शिवसन्मान’ची माहिती दिली गेली. यावेळी एका स्फटिकापासून तयार करण्यात आलेली भव्य ‘शाही तलवार’ उदयनराजे यांनी अमिताभ यांना भेट दिली. यावेळी अमिताभ यांनीही त्यांना हरिवंशराय बच्चन यांच्या काव्यसंग्रहाची भेट दिली. यावेळी पंकज चव्हाण, नाशिकचे धनंजय पाटील, अमरसिंग जाधवराव, अशोक सावंत व शेखर घोरपडे उपस्थित होते.
सातारकरांना सोडण्यासाठी अमिताभ फाटकापर्यंत...
उदयनराजेंसोबत झालेल्या बराच काळ चर्चेत अमिताभ बच्चन यांनी साताऱ्याच्या सौंदर्याचा उल्लेख केला. ‘सातारा बहोतही ब्युटिफुल स्पेस है... वहाँ मुझे जरुर आना है,’ या शब्दांत त्यांनी अनेकवेळा साताऱ्याचं मनापासून कौतुक केलं. उदयनराजे अन् त्यांचे सहकारी जेव्हा ‘जनक’ बंगल्यात गेले, तेव्हा त्यांच्या स्वागताला अमिताभ खाली आले होते. त्यानंतर बाहेर पडतानाही अमिताभ फाटकापर्यंत आले. त्यांचे हे विनयशील आदरातिथ्य पाहून भारावलेल्या उदयनराजेंनी त्यांच्यासमोर गाडीत न बसण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अमिताभ यांनी मोठ्या हक्कानं ‘अगर आप गाडी में नही बैठेंगे तो मैं बंगले का गेटही नही खोलूंगा,’ असं दिलखुलासपणे हसत सांगताच उदयनराजे अखेर गाडीत बसले.