अमोल कांबळेला पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:44 PM2017-08-10T23:44:03+5:302017-08-10T23:44:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : खरीप निधीतील तीन कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी आरोपी आणि खटाव तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार अमोल कांबळेला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात पोलिसांच्या वतीने तपासासाठी दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, असे म्हणणे मांडण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी, खरीप निधीत सुमारे तीन कोटी रुपयांचा घोटाळा केल्यावरून तत्कालीन तहसीलदार कांबळेच्या विरोधात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर डॉ. कांबळे फरार झाला होता. कांबळेचा शोध घेण्यासाठी वडूज पोलिस ठाण्यातील पथकाने उस्मानाबाद व इतर ठिकाणी तपास यंत्रणा राबविली होती. मात्र, कांबळे अटकपूर्व जामीन घेण्यासाठी सातारा येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.
गुरुवारी दुपारी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात कांबळेला हजर करण्यात आले. न्यायाधीश डी. एम. झाटे यांनी ‘पोलिसांबाबत काय तक्रार आहे का ?’ अशी विचारणा केली असता कांबळेने ‘नाही,’ असे उत्तर दिले. त्यानंतर पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन तपासाच्या दृष्टीने सखोल चौकशी करण्यासाठी दहा दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असे म्हणणे मांडले.
सहायक सरकारी अभियोक्ता अभिजित गोपलकर यांनी ‘कांबळेवर शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा मोठा गुन्हा आहे,’ असे म्हणणे मांडले. यावेळी कांबळेच्या वकिलांनीही बाजू मांडली. सहायक सरकारी अभियोक्ता गोपलकर व कांबळेचे वकील पी. जी. नलवडे यांचे म्हणणे ऐकून न्यायाधीशांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
कांबळेंना कडक शिक्षा देण्याची मागणी
वडूज : शासकीय रकमेच्या अपहारप्रकरणी अटकेत असलेल्या उपजिल्हाधिकारी अमोल कांबळे यांना कडक शिक्षा करावी, अशा मागणीचे निवेदन शहाजीराजे मित्र मंडळ व खटाव तालुका सोशल फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार सुशील वेल्हेकर यांना देण्यात आले आहे. यावेळी तहसील कार्यालयासमोर अमोल कांबळेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या निवेदनात म्हटले आहे की, अमोल कांबळे यांना व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात येऊ नये. अनुदानाचा पैसा खाऊन शेतकºयांवर उपासमारी व आत्महत्येसारखी परिस्थिती निर्माण करणाºया कांबळेंना कडक शिक्षा होण्याची गरज आहे. यावेळी शहाजी गोडसे, संदीप गोडसे, विजय शिंदे, गणेश गोडसे, वैभव फडतरे, जगन्नाथ इंगळे, सुनील गोडसे, विक्रम गोडसे आदी उपस्थित होते.