सातारा: बोरखळच्या तरुण सरपंचाची आत्महत्या, आठ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:30 PM2022-10-12T12:30:26+5:302022-10-12T12:32:16+5:30
अत्यंत हुशार आणि कर्तबगार सरपंच म्हणून परिसरात परिचयाचे होते
शिवथर : बोरखळ, ता. सातारा येथील गावचे तरुण सरपंच अमोल नथुराम नलवडे (वय ३५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी समोर आली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या आत्महत्येने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमोल नलवडे हे बोरखळ गावचे सरपंच होते. राजकारणासोबतच ते पोल्ट्रीफार्मचा व्यवसाय करत होते. बोरखळ गावापासून जवळच जरंडेश्वर रोडवर त्यांचा पोल्ट्रीफार्म आहे. मंगळवार, दि. ११ रोजी वडील नथुराम नलवडे हे पोल्ट्रीफार्मकडे गेले होते. त्यावेळी पोल्ट्री फॉर्ममध्ये मुलगा अमोल नलवडे हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना याची माहिती दिली. सरपंचांनी आत्महत्या केल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर नागरिकांनी सातारा तालुका पोलिसांना माहिती देऊन पोल्ट्रीफार्मकडे धाव घेतली.
अमोल नलवडे हे अत्यंत हुशार आणि कर्तबगार सरपंच म्हणून परिसरात परिचयाचे होते. त्यांच्या आत्महत्येबाबत परिसरात उलटसुलट चर्चा असली तरी आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशीही चर्चा गावात सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.