खुशखबर! सातारा जिल्ह्यातील १३० आदर्श ग्रामसेवकांना एक आगाऊ वेतनवाढ

By नितीन काळेल | Published: June 27, 2024 07:01 PM2024-06-27T19:01:22+5:302024-06-27T19:01:57+5:30

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश 

An advance pay hike to 130 Adarsh Gram Sevaks in Satara district | खुशखबर! सातारा जिल्ह्यातील १३० आदर्श ग्रामसेवकांना एक आगाऊ वेतनवाढ

खुशखबर! सातारा जिल्ह्यातील १३० आदर्श ग्रामसेवकांना एक आगाऊ वेतनवाढ

सातारा : गावगाड्यात काम करणाऱ्या ग्रामसेवकांना आदर्श पुरस्कार देऊन त्यांचे बळ वाढविले जाते. याच ग्रामसेवकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या आदेशामुळे जिल्ह्यातील १३० आदर्श पुरस्कारप्राप्त ग्रामसेवकांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे ग्रामसेवक संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवकांच्या माध्यमातून चालतो. एका-एका ग्रामसेवकाकडे अनेक ग्रामपंचायतींचा कारभार असलातरी ते आपले कर्तव्य बजावतात. त्यामुळे या ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श पुरस्कार देण्यात येतो. प्रत्येक तालुक्यातून एका ग्रामसेवकाची निवड पुरस्कारासाठी होते. अशा आदर्श पुरस्कारप्राप्त ग्रामसेवकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने गेल्यावर्षी घेतला. याचा फायदा सातारा जिल्ह्यातीलही आदर्श पुरस्कारप्राप्त ग्रामसेवकांना झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील २००५-०६ ते २०१६-१७ या कालावधीत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त १३० जणांना एक आगाऊ वेतनवाढ पूर्वलक्षी लाभाने मिळणार आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी आदेश पारित केला आहे. या आदेशामुळे १३० आदर्श ग्रामसेवकांना आर्थिक लाभ होणार आहे. त्यामुळे ग्रामसेवक संवर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे आदींकडून ग्रामसेवक संघटनेला सहकार्य मिळाले.

जिल्हा परिषदेच्या या निर्णयाबाद्दल सातारा जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अभिजीत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस संदीप सावंत, दीपक दवंडे, विजयराव निंबाळकर, नंदकुमार फडतरे, रमेश साळुंखे, अनिता धायगुडे, सुरेश देसाई, अशोक मिंड आदींसह ग्रामसेवक संघटना पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.


जिल्ह्यातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कारप्राप्त १३० जणांना एक आगाऊ वेतनवाढ पूर्वलक्षी प्रभावाने मिळण्याचा आदेश झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. याबद्दल संघटनेच्यावतीने अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच यामुळे ग्रामसेवकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. - अभिजित चव्हाण, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनई १३६)

Web Title: An advance pay hike to 130 Adarsh Gram Sevaks in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.