साताऱ्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी उद्योग उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
By प्रमोद सुकरे | Published: November 25, 2022 04:29 PM2022-11-25T16:29:50+5:302022-11-25T16:30:53+5:30
‘रावणाला दहा तोंडं होती. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शंभर तोंडे आहेत. म्हणूनच कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्त उत्पन्न कसं मिळेल, याकडे कृषी विभागाने लक्ष दिले पाहिजे.
कऱ्हाड : ‘रावणाला दहा तोंडं होती. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शंभर तोंडे आहेत. म्हणूनच कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्त उत्पन्न कसं मिळेल, याकडे कृषी विभागाने लक्ष दिले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी सातारा जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी इंडस्ट्रीज साकारणार आहोत. तर कऱ्हाडचे विमानतळ एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करा. म्हणजे विमानतळाचा विकास गतीने होऊन त्याचा सर्वांना फायदा होईल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कऱ्हाड येथे शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिसप्रमुख समीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रतिवर्षी जे कृषी प्रदर्शन कऱ्हाडला आयोजित केले जाते, ही अभिमानाची बाब आहे. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. खुर्च्या, सत्ता, पदे येतात आणि जातात. मात्र, नेत्याला लोकांशी जिव्हाळ्याचे नाते जपता आले पाहिजे, हा गुण यशवंतरावांकडून शिकण्यासारखा आहे.
गेल्या तीन-चार महिन्यांत आमच्या सरकारने सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मी सातारा जिल्ह्याचा सुपुत्र आहे, याचा मला अभिमान आहे. त्यामुळे या जिल्ह्याप्रती माझी जबाबदारी वाढत आहे, याचे मला भान आहे. त्यामुळे निधी कमी पडू देणार नाही.’
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठं होणारं कऱ्हाडचं हे कृषी प्रदर्शन आहे. माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांनी या प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवली. ती शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरत आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र जिल्ह्यात सुरू करण्याचा आमचा मानस आहे. तर जिल्ह्यात डोंगराळ भागही खूप मोठा आहे. त्या भागासाठी जलयुक्त शिवारासारखी योजना जिल्ह्यासाठी आम्ही राबविणार आहोत. त्यासाठी जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांनी विशेष निधी द्यावा.’
यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, कृषी प्रदर्शनचे इव्हेंट प्रमुख संदीप गिड्डे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते
कऱ्हाडचे विमानतळ एमआयडीसीकडे द्या
कऱ्हाडचे विमानतळ एमआयडीसीकडे द्या. त्याचा विकास आम्ही तातडीने करू व सातारा जिल्ह्यात ॲग्रो इंडस्ट्रीज सुरू करावी, अशी मागणी उद्योगमंत्री म्हणून यावेळी उदय सामंत यांनी केली. त्या मागणीला दुजोरा देत मुख्यमंत्री शिंदे यांनी या दोन्ही गोष्टीला आपल्या भाषणात संमती दिली.
बाळासाहेब म्हणे.. ते आम्हीच केले!
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सुमारे ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यावेळी व्यासपीठावर असणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी, ते तर आम्ही जाहीर केले होते, अशी टिप्पणी केली. त्यावर मंत्री सामंत यांनी ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे भाग्य मात्र एकनाथ शिंदे यांना लाभले, असा हजरजबाबीपणा दाखविला. त्यावर उपस्थितांमध्ये खसखस पिकली.