कोरेगावात भरधाव माल ट्रकच्या धडकेत वृद्ध दाम्पत्य ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 03:02 PM2023-01-29T15:02:10+5:302023-01-29T15:04:12+5:30

या अपघातात तांदूळवाडीतील वृद्ध दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास झाला. कोरेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

An elderly couple was killed in a collision with a speeding goods truck in Koregaon | कोरेगावात भरधाव माल ट्रकच्या धडकेत वृद्ध दाम्पत्य ठार

कोरेगावात भरधाव माल ट्रकच्या धडकेत वृद्ध दाम्पत्य ठार

Next

- साहिल शहा

कोरेगाव : कोरेगाव शहरात पंचायत समिती कार्यालयानजीक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करत येऊन समोर येणाऱ्या दुचाकीला भरधाव मालट्रकने जोरात धडक दिली. या अपघातात तांदूळवाडीतील वृद्ध दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास झाला. कोरेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

बजरंग नारायण काटकर (वय ५९) व पत्नी शोभा बजरंग काटकर (५५, दोघे रा. तांदूळवाडी, ता. कोरेगाव) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती असे की, बजरंग काटकर व शोभा काटकर हे दोघे दुचाकीवरून कोरेगाव शहरात येत होते. त्याचवेळी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली ही कुमठे फाट्याच्या दिशेने निघाली होती. ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करत भरधाव मालट्रक निघाला होता. ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. दुचाकी सुमारे वीस ते पंचवीस फूट फरफटत गेल्याने काटकर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने काटकर दाम्पत्याला ग्रामीण रुग्णालयात नेले. अपघातानंतर मालट्रक चालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक पोलिस ठाण्याच्या आवारात आणून लावला आहे. ग्रामीण रुग्णालयात बजरंग काटकर व शोभा काटकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

दुचाकीत सापडली भगवद्गिता
कटकर दाम्पत्य हे कोरेगाव शहराच्या दिशेने येत होते. त्यांच्या दुचाकीला पिशवी अडकवली होती. त्या पिशवीमध्ये भगवद्गीता होती. अपघातानंतर रस्त्याच्या कडेला पडलेल्या पिशवीतून भगवद्गिता पाहताच नागरिक देखील हळहळले.

Web Title: An elderly couple was killed in a collision with a speeding goods truck in Koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.