अजब व्यवहार! ‘तो’ पैसे मागत गेला, ‘हा’ मागेल तेवढे देत गेला; पावणे दोन लाखांना गंडा
By दत्ता यादव | Published: August 28, 2023 09:06 PM2023-08-28T21:06:47+5:302023-08-28T21:07:24+5:30
आयफोन २५ हजारांचा; प्रशिक्षित अभियंत्याने दिले पावणेदोन लाख
सातारा : केवळ २५ हजारांत आयफोन विकत मिळत असल्याने एका अभियंत्याने हा फोन खरेदीसाठी तब्बल पावणेदोन लाख रुपये गमावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्वजित युवराज कदम (वय २१, रा. कांगा कॉलनी, सदर बझार, सातारा) हा साताऱ्यातील एका महाविद्यालयात मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. काही दिवसांपूर्वी ओएलएक्सवर २५ हजारांत आयफोन विकायचा असल्याची जाहिरात त्याने पाहिली. त्या व्यक्तीने आपण आर्मी ऑफिसर असल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे त्याचा विश्वास बसला.
सुरुवातीला विश्वजित कदम याने त्याला पाच हजार रुपये पाठविले. त्यानंतर २० हजार पाठवले. मात्र, संबंधित व्यक्तीने चुकीचे ट्रान्झेक्शन झाले असून, हे रद्द करण्यासाठी आणखी ४० हजार रुपये पाठवा, असे सांगितले. तो आर्मी ऑफिसर जसे सांगत गेला तसे विश्वजित त्याचे ऐकत गेला. कधी ३० तर कधी ४० हजार असे करत त्याने २ लाख ९२ हजार ४१९ रुपये त्या व्यक्तीला ऑनलाइन पाठवले. २५ हजारांचा मोबाइल खरेदी करायला गेलेल्या विश्वजित कदम याने जवळपास पावणेदोन लाख रुपये त्याला दिले. असे असतानाही त्याची आणखी मागणी वाढत गेल्याने कदम याला अखेर जाग आली. त्यानंतर त्याने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
२५ हजारांच्या मोबाइलसाठी आपण एवढे पैसे देतोय, याची जरा सुद्धा त्याच्या मनात शंका कशी आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून, हे नेमके प्रकरण काय आहे, याचा तपास आता सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार पोळ हे करीत आहेत.
स्वत:सोबत पाच मित्रही फसले.
विश्वजित कदम याने स्वत:चे १ लाख १२ हजार रुपये आयफोनसाठी त्या आर्मी ऑफिसरला दिले. मात्र, उर्वरित पैसे हे त्याने त्याच्या पाच मित्रांना देण्यास सांगितले. त्या मित्रांनीही विश्वजितवर विश्वास ठेवून त्या व्यक्तीच्या मोबाइलवर ऑनलाइन पैसे पाठवले. सुशिक्षित शिक्षण घेणारी मुले अशाप्रकारे फसवणुकीला बळी पडल्याने पोलिसांकडूनही आश्चर्य व्यक्त होत आहे.