आॅनलाईनचा घोळ, अभियोग्यता चाचणीसाठी परीक्षार्थींची कसरत, सातारा जिल्ह्याबाहेर केंद्र मिळत असल्याने हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:49 AM2017-12-15T11:49:40+5:302017-12-15T11:59:07+5:30
खासगी शाळांमधील शिक्षण सेवक भरतीसाठी होऊ घातलेल्या अभियोग्यता व बुद्धिमता चाचणीसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी परीक्षार्थींना कसरत करावी लागत आहे. राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे अधिक पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी शिक्षण परिषदेच्या वतीने दि. १२ ते २१ दरम्यान आॅनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत.
पिंपोडे बुद्रुक : खासगी शाळांमधील शिक्षण सेवक भरतीसाठी होऊ घातलेल्या अभियोग्यता व बुद्धिमता चाचणीसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी परीक्षार्थींना कसरत करावी लागत आहे.
राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे अधिक पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी शिक्षण परिषदेच्या वतीने दि. २१ डिसेंबर दरम्यान आॅनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत.
राज्यातील सुमारे ६७ केंद्रांवर संगणकाच्या उपलब्धतेनुसार दिवसभरात सकाळी नऊ ते अकरा, दुपारी साडेबारा ते अडीच व चार ते सहा अशा तीन सत्रांत परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा प्रवेश अर्जावेळी परीक्षार्थींनी प्राधान्यक्रम दिलेल्या परीक्षा केंद्रानुसारतच परीक्षा केंद्रे दिले गेले आहे.
तरीही बहुतांशी परीक्षार्थींना दुसरा, तिसरा प्राधान्यक्रम असलेली सातारा जिल्ह्याबाहेरील केंद्र मिळत आहेत. त्यामुळे दुर्गम, ग्रामीण भागातील परीक्षार्थिंना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
परीक्षेचे पहिले सत्र सकाळी नऊ वाजता सुरू होते. त्यामुळे परीक्षार्थींना जिल्ह्याबाहेरील केंद्रावर पोहोचणे अशक्य झाले आहे. याउलट परीक्षेचे शेवटचे सत्र सहा वाजता संपत असल्याने परीक्षा केंद्र्रावरून घरी जाणाऱ्या परीक्षार्थींना वाहतुकीच्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.