‘आपुलकी’च्या अंगणात बहरला ‘आनंद’

By admin | Published: December 6, 2015 10:44 PM2015-12-06T22:44:13+5:302015-12-07T00:28:47+5:30

गुड न्यूज

'Anand' in the courtyard of 'Affection' | ‘आपुलकी’च्या अंगणात बहरला ‘आनंद’

‘आपुलकी’च्या अंगणात बहरला ‘आनंद’

Next



भुर्इंज : पाचवड (ता. वाई) येथील आपुलकी विशेष मुलांच्या शाळेचा माजी विद्यार्थी आनंद गुजर याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
दहा हजार रुपये रोख, एस. टी. प्रवासाचा एका सहकाऱ्यासह मोफत पास, राज्यातील सर्व शासकीय विश्रामगृहात ‘विशेष अतिथी’ म्हणून राहण्याची मोफत सुविधा यासह विविध सोयी-सवलती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आनंद हा दोन्ही पायांनी व हाताने अपंग आहे. तरीदेखील आपुलकी शाळेत मिळालेल्या शिक्षण व मार्गदर्शनामुळे तो आज स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी सज्ज झाला आहे.
मतिमंद मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या आपुलकी शाळेने नेहमीच विशेष मुलांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून आनंद या माजी विद्यार्थ्याचे पुनर्वसन व्हावे, यासाठीही संस्थेच्या मुख्याध्यापिका सुषमा पवार या गेली अनेक वर्षे आनंदच्या संपर्कात होत्या. शासनाच्या पुरस्कारासाठी आनंदचा प्रस्तावही आपुलकी संस्थेतच तयार करुन पाठवला. आनंद हा विशेष मुलगा असला तरी मुळातच खूप हुशार आहे.
दोन चाकांवरुन शाळेत जाताना आधी हिडीस-फिडीस करणारे नंतर त्याला वाट देऊ लागले, शाळेत पोहोचवू लागले. आनंदमध्ये आत्मविश्वास एवढा वाढला की, आता आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे हा ध्यास त्याने घेतला. या ध्यासातूनच जावली पंचायत समितीचे सभापती सुहास गिरी, कुडाळचे सरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या माध्यामतून त्याला शासकीय अनुदानातून झेरॉक्स मशीन मंजूर झाले. या प्रकरणातही त्याला आपुलकी शाळेने मदत केली.
शाळेच्या सर्वच उपक्रमात अग्रेसर असणारा आनंद विविध कलागुणांतही अग्रेसर आहे. त्यामुळेच शाळेने राज्य पुरस्कारासाठी प्रस्ताव तयार केला आणि या माजी विद्यार्थ्यास तो पुरस्कार नुकताच जाहीर झाला. आपुलकी शाळेने आतापर्यंत अशा प्रकारे स्वत:च्या पायावर उभ्या केलेल्या विद्यार्र्थ्यांच्या संख्येने हॅट््ट्रिक केली आहे. या सर्व कामात समाजकल्याण अधिकारी सचिन साळे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा कानडे यांचीही मोलाची मदत लाभली, अशी माहिती सुषमा पवार यांनी दिली. दरम्यान, आनंदला जे झेरॉक्स व्यवसायासाठी मेढा येथे तहसील कार्यालय आवारात जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)


त्यांनीच दिली वाट
कुडाळहून पाचवड येथे शाळेत येत असताना बसस्थानकापासून शाळेपर्यंत आनंद दोन चाकांवर येत असे. सुरुवातीला त्याला अनेकांनी हिडीसफिडीस केले. पण शाळेतून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्याने भीती, लाज बाळगणे सोडून दिले. त्यामुळेच त्याच्यात आत्मविश्वास एवढा वाढला की नंतर तो संपूर्ण पाचवड परिसराचा लाडका झाला.

Web Title: 'Anand' in the courtyard of 'Affection'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.