चोराच्या वाडीत ‘आनंदा’चा ‘पूर’

By admin | Published: February 3, 2015 11:09 PM2015-02-03T23:09:17+5:302015-02-04T00:06:12+5:30

सरकार दरबारी नावबदल : गावकऱ्यांच्या वीस वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश

Ananda's 'flood' in Chorara wadi | चोराच्या वाडीत ‘आनंदा’चा ‘पूर’

चोराच्या वाडीत ‘आनंदा’चा ‘पूर’

Next

सातारा : आपल्या गावाला चोराची वाडी म्हणून हिणवावं, असं कोणाला वाटेल बरे! पण हे दुखरं सत्य गेली वीस वर्षांपासून आपल्या काळजात घेऊन वावरणारं एक गाव वाई तालुक्यात काल-परवापर्यंत होतं. ‘चोराची वाडी’ या नावानं गावकऱ्यांची अक्षरश: झोपमोड केली होती. मुलांच्या शाळेच्या दाखल्यावर, सातबारावर तसेच इतर शासकीय कागदपत्रांवर ‘चोराची वाडी’ असा उल्लेख असल्यामुळे गावकऱ्यांना अपमानास्पद वाटत होते. गावाचं नाव बदल्यासाठी गावकरी वीस वर्षांपासून धडपडत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले अन् आता ‘चोराची वाडी’ ही आता ‘आनंदपूर’ नावानं ओळखली जाणार असल्याने गावकऱ्यांच्या आनंदाला जणू भरतं आलं आहे.वाई तालुक्यातील चोराची वाडी गावाची कथा मोठी मजेशीर आहे. गावाला चोराची वाडी हे नाव कसं मिळालं, याबद्दल सरपंच अंकुश सकपाळ यांनी सांगितलं की, खंडाळा तालुक्यातील सध्याच्या वाठार कॉलनी येथील साळुंखे आडनावाची काही कुटुंबं याठिकाणी वास्तव्यास आली. त्यांचे पूर्वीचे आडनाव ‘चोर’ असे होते. आजही वाठार कॉलनी या गावाला ‘चोराचे भादे’ नावाने ओळखले जाते. ‘चोर’ आडनावांच्या कुटुंबांची संख्या जास्त असल्यामुळे या वाडीला ‘चोराची वाडी’ असे संबोधले जाऊ लागले. हीच ओळख आजपर्यंत कायम होती. जुने दाखले, शेतीचे उतारे पाहिले तर आजही ‘चोराची वाडी’ असा उल्लेख आढळतो. लोक आपल्या गावाला चोराची वाडी म्हणून ओळखत असल्याने जास्त अपमानास्पद वाटत होते. सरकारी कागदोपत्री तसेच पत्ता सांगतानाही ‘चोराची वाडी’ हा उल्लेख गावकऱ्यांना अपमानास्पद वाटत होता. केवळ नावामुळं आपल्या गावाची बदनामी होते, असं ग्रामस्थांना मनापासून वाटत होते. त्यामुळे गावाची ही ओळख पुसली पाहिजे, यासाठी वीस वर्षांपूर्वी गावाने एकत्र येऊन ठराव केला होता. मात्र, शासकीय पातळीवर पाठपुरावा होत नव्हता. मात्र, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार यांनी याकामी पुढाकार घेतला. पवार यांनी गावाच्या नावात बदल व्हावा, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करून घेतला. त्यानंतर पुढे वाई पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सभेत हा ठराव मंजूर करून घेण्यात आला. एक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर ७ जानेवारी २०१५ रोजी ग्रामपंचायतीला सामान्य प्रशासन मंत्रालयातून गावाचे नाव बदलण्यात आल्याचे पत्राने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

गावाच्या नावात बदल व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर वर्षभरापासून प्रयत्न केले. यासाठी आमदार मकरंद पाटील व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी सहकार्य केले. शासकीय कागदपत्रांची पूर्तता पूर्ण होऊन नुकतेच गॅझेटही झाले आहे. यापुढे चोराची वाडी’ हे गाव ‘आनंदपूर’ या नावाने ओळखले जाईल, हे मोठे यश आहे.
- शशिकांत पवार, सदस्य, जिल्हा परिषद, सातारा
मुलांच्या दाखल्यावर चोराची वाडी, खाते उताऱ्यावर चोराची वाडी, सातबारावर चोराची वाडी.... या उल्लेखामुळं अपमानास्पद वाटत होतं. मुलांना शाळेत लाजिरवाणं वाटायचं. ही ओळख कायमची पुसली जावी आणि गावाला चांगल्या नावानं ओळखलं जावं, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. ‘आनंदपूर’ नावामुळं गाव आनंदी झालं आहे.
- अंकुश सकपाळ, सरपंच


पै-पाहुण्यात हसं
‘चोराची वाडी’ हे बोचरं नाव मनाला सतत वेदना देत होतं. पै-पाहुण्यांतही होणारं हसं अन् ओळखी-पाळखीच्यांकडून सतत होणारी मस्करी यामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू मावळला होता. यासाठीच की काय ग्रामस्थांनी ‘चोराची वाडी’चं नाव बदलून ‘आनंदपूर’ ठेवण्याचं योजलं होतं. शासकीय कागदोपत्री गावाचं नाव आता बदलल्यामुळं साऱ्या गावात नावाप्रमाणेच ‘आनंदा’चा जणू ‘पूर’ आल्याचं वातावरण निर्माण झालं आहे.

Web Title: Ananda's 'flood' in Chorara wadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.