श्रीपालवण येथे आढळला कन्नड भाषेतील प्राचीन शिलालेख, ‘जिज्ञासा’च्या माणदेश शाखेचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 02:28 PM2022-07-18T14:28:14+5:302022-07-18T14:28:38+5:30

शिलालेखाची भाषा ही जुनी कन्नड म्हणजेच ‘हळे कन्नड’ असल्याने ही भाषा वाचणाऱ्यांची संख्या आता नगण्य

Ancient Kannada inscription found at Sripalavan, Research by Mandesh branch of Jijyasa | श्रीपालवण येथे आढळला कन्नड भाषेतील प्राचीन शिलालेख, ‘जिज्ञासा’च्या माणदेश शाखेचे संशोधन

श्रीपालवण येथे आढळला कन्नड भाषेतील प्राचीन शिलालेख, ‘जिज्ञासा’च्या माणदेश शाखेचे संशोधन

googlenewsNext

सातारा : साताऱ्याच्या प्राचीन इतिहास संकलनात जिज्ञासा मंच माणदेश शाखेच्या वतीने एक अभ्यास मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत नुकताच माण तालुक्यातील श्रीपालवण या गावात अतिशय महत्त्वपूर्ण असा ‘हळे कन्नड’ या लिपीतील प्राचीन शिलालेख आढळून आला आहे.
शिलालेखाची अवस्था ऊन, वारा, पाऊस यांच्या माऱ्यामुळे अतिशय जीर्ण झाली असून, त्यातील काही भागच व्यवस्थित दिसू शकतो.

शिलालेखाची भाषा ही जुनी कन्नड म्हणजेच ‘हळे कन्नड’ असल्याने ही भाषा वाचणाऱ्यांची संख्या आता नगण्य आहे. त्यामुळे शिलालेखाचे ठसे तसेच थ्रीडी स्कॅनिंग फोटो घेऊन दक्षिणेतील काही तज्ज्ञ लोकांच्या मदतीने शिलालेखाचे वाचन सुरू आहे.

श्रीपालवण या क्षेत्राजवळ ज्या ठिकाणी शिलालेख आढळून आला, त्याच ठिकाणी दोन अपूर्ण मंदिरांचे ढाचेही उभे दिसतात. तसेच काही जीर्ण मूर्तीदेखील आहेत. या मूर्तींमध्ये अतिशय सुंदर असे शैव द्वारपाल, ब्रह्मदेव, सप्तमातृकातील काही प्रतिमा तसेच गणपतीचे अंकन असलेली एक स्मृतिशिळा देखील आहे. अशी स्मृतिशिळा सातारा जिल्ह्यात प्रथमच आढळून आली आहे.

या शोधमोहिमेसाठी वैभव ढेंबरे, तुकाराम ढेंबरे, संदीप ढेंबरे, धनराज ढेंबरे, लक्ष्मण चव्हाण, साहिल कदम, अथर्व कदम, राम सूर्यवंशी, हिरामण सूर्यवंशी, तुषार कदम व श्रीपालवण ग्रामस्थ तसेच श्री रामेश्वर फाउंडेशनचे सहकार्य लाभले. जिज्ञासा माणदेश शाखेचे कुमार गुरव, सुनील काटकर सर्वेक्षणाचे काम करीत आहेत, तर जिज्ञासा संस्थेचे प्रा. अमृत साळुंखे, विक्रांत मंडपे, नीलिमा पंडित, धैर्यशील पवार यावर संशोधन करीत आहेत.

असा आहे शिलालेख

शिलालेख सुमारे तीन फूट उंच व दोन फूट रुंदीच्या काळ्या पाषाणावर कोरलेला असून, सर्वांत वर चंद्र-सूर्याचे अंकन केलेले दिसते. त्याखाली मधोमध शिवपिंड व उभ्या नंदीचे चित्रण केले आहे. शिवाची आराधना करणारा एक पुरुषही कोरला आहे. शिलालेखाची भाषा ही जुनी कन्नड लिपी म्हणजेच ‘हळे कन्नड’ असून. शिलालेख जीर्ण असला तरी त्यावर सुमारे ३३ ओळी असल्याचे स्पष्टपणे जाणवते.

नादध्वनी करणारे स्तंभ

या परिसरात ज्या अपूर्ण मंदिराचे ढाचे उभे आहेत, त्यातील काही स्तंभांवर कठीण वस्तूने आघात केल्यास त्यातून नाद ध्वनी उमटतात. दक्षिण भारतात अशा दगडांचा वापर केलेली स्थापत्य रचना दक्षिण भारतात आढळते. परंतु, दक्षिण महाराष्ट्रात अशा दगडांचा वापर करून केलेली स्थापत्य रचना पहिल्यांदाच आढळून आली आहे.


इतिहास संशोधन, संकलन व संवर्धन यासाठी जिज्ञासा संस्था वेळोवेळी आग्रही भूमिका घेत आहे. माणदेशातील इतिहासप्रेमींनी यात जरूर सहभागी व्हावे. - प्रा. अमृत साळुंखे, शहाजीराजे महाविद्यालय खटाव

Web Title: Ancient Kannada inscription found at Sripalavan, Research by Mandesh branch of Jijyasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.