रुग्ण घरात अन् प्रशासन आठ दिवसांनंतर दारात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:00+5:302021-04-28T04:43:00+5:30
सातारा : जिल्ह्यात गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची अवस्था सध्या ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. सद्य:स्थितीला ...
सातारा : जिल्ह्यात गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची अवस्था सध्या ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. सद्य:स्थितीला तब्बल १२ हजार ९३५ रुग्ण घरातून उपचार घेत आहेत. हे रुग्ण घरी आहेत की आणि कोठे, त्यांची दैनंदिन आरोग्य तपासणी, गृहभेटीद्वारे सर्व्हे अशा सर्वच पातळीवर प्रभावी उपाय राबविण्यास प्रशासन कमी पडत असल्याने जिल्ह्याची कोरोना परिस्थिती गंभीर वळणावर येऊन ठेपली आहे.
एप्रिल महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण आढळून येऊ लागल्याने कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याची बेड कमी आणि रुग्ण अधिक अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे घरातून उपचार घेण्याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांपुढे दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही.
जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमधील बेडची क्षमता ३ हजार ३८९ इतकी आहे, तर कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार ६६६ वर पोहोचली आहे. सातारा व इतर जिल्ह्यांतील मिळून २ हजार ९४५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असले तरी उर्वरित रुग्णांचे काय? हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. बेडअभावी रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार घेण्याशिवाय गत्यंतर नाही. अशा रुग्णांना विलगीकरणात उपचार घेण्याची व्यवस्था आहे की नाही, हे रुग्ण १४ दिवस खरंच विलगीकरणात राहतात का, योग्य पद्धतीने आहार व औषधोपचार घेतात का, अशी कोणतीच पाहणी प्रशासनाकडून केली जात नाही.
गतवर्षी प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला. त्यातून आयएलआय, सारी व कोरोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेण्यात आला. यंदा असा एकही सर्व्हे जिल्ह्यात झाला नाही. कोरोनाबाधित रुग्ण निम्मा बरा झाल्यानंतर किंवा आठ दिवसांनंतर आरोग्य पथक बाधितांंच्या घरी पोहोचत आहे. हा प्रकार कुठेतरी थांबवायला हवा. एकूणच ठोस उपाययोजना राबविण्यात प्रशासन कमी पडत असल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, गृहविलगीकरणातील रुग्णांनाही वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे.
(चौकट)
यामुळे वाढतेय संक्रमण
१. कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल येईपर्यंत संबंधित व्यक्ती निर्धास्तपणे वावरतात. त्यामुळे ते कोरोनाबाधित आहेत किंवा नाही याचा कोणताच मागमूस लागत नाही.
२. गृहविलगीकरणातील रुग्णांच्या घरी उपचारासाठी स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह आहे की नाही याची पाहणी केली जात नाही.
३. बहुतांश कुटुंबांची घरे ही छोटी आहेत. अशा परिस्थितीत घरातून उपचार घेणे धोक्याचे ठरते. हा धोका पत्करून रुग्ण घरातूनच उपचार घेत आहेत.
४. कोरोनाबाधित व्यक्तीचा अहवाल आल्यानंतर चार ते पाच दिवसांनी संबंधित परिसर सील केला जातो. तोपर्यंत बाधित व्यक्तींचा संचार सुरूच असतो.
५. प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा सर्व्हे होत नाही. नागरिकांच्या आरोग्याच्या नोंदी घेतल्या जात नाहीत.
६. कोरोना झाल्यानंतर स्वत:ची व कुटुंबाची कशी काळजी घ्यावी, आहार कसा असावा व कसा नसावा याबाबतचे मार्गदर्शन देखील होत नाही.
(चौकट)
आठ दिवसांत एकच फोन आला..
आम्ही घरातील तीन व्यक्ती कोरोनाबाधित होतो. सर्वांनी घरातूनच उपचार घेतले. या कालावधीत आम्ही शासन नियमांचे काटेकोर पालन केले; परंतु आमच्या आरोग्याची कोणीही प्रत्यक्षात येऊन तपासणी केली नाही. आठ दिवसांत केवळ एक फोन आला होता. त्याद्वारे विचारपूस करण्यात आली, अशी खंत कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीने ‘लोकमत’पुढे व्यक्त केली.
(चौकट)
आधी पॉझिटिव्हचा रिपोर्ट येऊन या
कोरोनासदृश लक्षणे असलेले नागरिक जिल्हा अथवा जवळच्या शासकीय रुग्णालयात कोरोना चाचणी करतात. यापैकी बहुतांश नागरिक हे अत्यवस्थ असतात. जिल्हा रुग्णालयात औषधांची मागणी केल्यानंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ‘आधी पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट येऊ या मग औषधे देऊ’ असे सांगितले जाते. यामुळे अनेकांना खासगी रुग्णालयांत धाव घ्यावी लागत आहे.
(पॉइंटर)
सातारा जिल्ह्याची कोरोना स्थिती
एकूण कोरोनाबाधित १६,६६६
पुरुष ९८४६
महिला ६८२०
-------------
गृहविलगीकरण आतील रुग्ण १२९३५
पुरुष ७६२१
महिला ५३१४
--------------
रुग्णालयात दाखल २९४५
पुरुष १९९७
महिला ९४८
---------------
जिल्ह्यातील बेडची संख्या ३३८९
शासकीय ९०९
खासगी २४८०
---------------
उपचार करणारी एकूण रुग्णालय ४९