साताऱ्यात अंगणवाडी, आशा सेविकांचा मराठा समाज सर्वेक्षणावर बहिष्कार
By नितीन काळेल | Published: January 22, 2024 07:25 PM2024-01-22T19:25:22+5:302024-01-22T19:25:48+5:30
सातारा : मानधन वाढ झाली नसल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका व गटप्रर्वतकांनी राज्य शासनाच्या मराठा समाज ...
सातारा : मानधन वाढ झाली नसल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका व गटप्रर्वतकांनी राज्य शासनाच्या मराठा समाज आरक्षण सर्वेक्षणावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. याबाबत तालुक्यातालुक्यात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंगणवाडी कर्मचारी संघटना (सीटू) आणि सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली दि. ४ डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने मानधन वाढ हा विषय आहे. संपाला दीड महिना झालातरी शासनाने मागण्यांवर विचार केलेला नाही. त्यामुळे संघटना संपावर ठाम आहे. त्यामुळे आता संघटनेने मराठा समाज आरक्षण सर्वे करण्यावर बहिष्कार टाकला आहे.
त्याचबरोबर आशा सेविकांना ७ हजार आणि गटप्रवर्तकांना १० हजार रुपये मानधन देण्याचे मान्य करुनही याबाबत शासनाने अध्यादेश काढलेला नाही. त्यामुळे आशा आणि गटप्रवर्तक आंदोलनात आहेत. त्यांनीही शासनाने मागण्याकडे लक्ष दिले नसल्याने मराठा समाज आरक्षण सर्वेवर बहिष्कार टाकला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हा बहिष्कार राहील, असा इशाराही देण्यात आलेला आहे.