अंगणवाडीसेविका करणार आंदोलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:41 AM2021-02-11T04:41:08+5:302021-02-11T04:41:08+5:30
वाई : ‘अंगणवाडीसेविकांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेले आहेत. १५ फेब्रुवारी अंगणवाडीसेविका संघ, भारतीय मजदूर संघटना संयुक्तरीत्या संपूर्ण देशात ...
वाई : ‘अंगणवाडीसेविकांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेले आहेत. १५ फेब्रुवारी अंगणवाडीसेविका संघ, भारतीय मजदूर संघटना संयुक्तरीत्या संपूर्ण देशात जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करणार आहेत’, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे संघटनमंत्री रवींद्र पुरोहित यांनी अंगणवाडीसेविका संघाच्या संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
कोरोनासारख्या महामारीच्या काळात अंगणवाडीसेविकांनी कसलीही तमा न बाळगता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाऊन प्रसार व प्रचार केला. परंतु, अंगणवाडीसेविकांकडे कोणीही लक्ष दिले नाही, यात कसल्याही प्रकारचा भत्ता प्रशासनाने या सेविकांना दिला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडीसेविकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. कोणतेही शासन आले तरीही अंगणवाडीसेविकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही. आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरी काहीही पडले नाही. त्यातच अंगणवाडीसेविका संघटनेमध्ये अनेक संघटना काम करीत असल्याने राज्यकर्ते त्याच बाबींचा फायदा घेत आहे. यामध्ये अंगणवाडीसेविकांना सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी. योग्य पद्धतीने मानधन मिळावे, अंगणवाडी सेविकांना सहायक शिक्षिका म्हणून मान्यता मिळावी, भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन मिळावे. इतर शिक्षकांप्रमाणे अंगणवाडीसेविकांना वैयक्तिक व वैद्यकीय रजा मिळाव्यात, यांचा समावेश आहे. यावेळी भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र बोरकर, अंगणवाडीसेविका संघाच्या जिल्हा सरचिटणीस वनिता सावंत, नंदा सणस, कोमल जगताप, रोहिणी ढगे, शोभा शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राथमिक शाळेतील मुलांचे पायाभरणी करणाऱ्या वर्गाकडे दुर्लक्ष, प्राथमिक शाळेतील अंगणवाडीतील मुलांकडे अतिशय काटेकोरपणे पाहिल्याशिवाय मुलांचा बेस योग्य रीतीने तयार होत नाही. अंगणवाडीत शिकणारा विद्यार्थी योग्य पद्धतीने शाळेत यायला लागल्यास पुढे जाऊन शिक्षणाचा प्रवाह त्याचा योग्य होऊन तो चांगल्या पद्धतीने शाळेत जाऊन शिक्षण घेतो. तो पायाच कमकुवत राहिल्यास विद्यार्थी घडताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते; परंतु शिक्षणाचा पाया घडविणाऱ्या अंगणवाडीसेविकांकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करते. त्यामुळे या सेविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरी, हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे.