महिना २६ हजार मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By नितीन काळेल | Published: November 28, 2023 07:29 PM2023-11-28T19:29:35+5:302023-11-28T19:30:49+5:30

‘सीटू’ संघटनेच्या नेतृत्वाखाली सहभागी

Anganwadi workers march to Satara Collectorate for 26,000 per month salary | महिना २६ हजार मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महिना २६ हजार मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सातारा : अंगणवाडी सेविकांना २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार रुपये मानधन देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने (सीटू) मंगळवारी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. यामध्ये शेकडोच्या संख्येत सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महागाई वाढत चालली आहे. या महागाईप्रमाणेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात यावी. तसेच अनेकवेळा चर्चा आणि कामावर बहिष्कार घालूनही शासनाने मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे आता ४ डिसेंबरपासून सेविका आणि मदतनीस सर्व कामकाज बंद करुन आणि अंगणवाडी बंद ठेवून बेमुदत संपावर जाणार आहेत.

अंगणवाडी सेविकेला २६ हजार आणि मदतनीसला २० हजार रुपये मानधन देण्यात यावे, या कर्मचाऱ्यांची पदे वैधानिक असून त्यांना मिळणारा मोबदला हे वेतनच आहे. त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करुन त्याअनुषंगाने वेतनश्रेणी आणि ग्रॅच्युईटी, भविष्यनिर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा लागू करण्यात याव्यात. मानधन वाढलेतरी महागाई दुपटीने वाढते. त्यामुळे महगाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी, पेन्शन देण्याचा प्रस्ताव मंत्र्यांनी मान्य केला आहे. त्यामुळे तो तयार करुन हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा. महानगर हद्दीत जाण्याचे निकष शिथील करुन अंगणवाड्यांसाठी ५ हजार ते ८ हजार रुपये भाडे मंजूर करावे, आहाराचा आठ रुपये दर अत्यल्प आहे. त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याएेवजी वाढत आहे. परिणामी सर्वसाधारण बालकासाठी १६ आणि अति कुपोषित बालकासाठी २४ रुपये करावा, अशा आमच्या मागण्या आहेत, असे निवेदनात स्पष्ट केले आहे.

अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये काॅ. माणिक अवघडे, प्रतीभा भोसले, चंद्रकला शिंदे, मनिषा काटकर, छाया पंडित, वैशाली लोहार, अर्चना भिसे यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Anganwadi workers march to Satara Collectorate for 26,000 per month salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.