अंगणवाडी सेविका शासकीय कामासाठी स्वत:च्याच मोबाईलचा करतात वापर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:44 AM2021-09-15T04:44:56+5:302021-09-15T04:44:56+5:30
सातारा : शासनाकडून देण्यात आलेल्या मोबाईलच्या तक्रारी वाढल्याने अंगणवाडी सेविकांनी अनेक जिल्ह्यात ते परत केले. पण, सातारा जिल्ह्यात महिला ...
सातारा : शासनाकडून देण्यात आलेल्या मोबाईलच्या तक्रारी वाढल्याने अंगणवाडी सेविकांनी अनेक जिल्ह्यात ते परत केले. पण, सातारा जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाकडे एकही मोबाईल जमा झाला नाही. असे असले तरी सेविका सध्या स्वत:च्या मोबाईलचाच वापर आवश्यक शासकीय कामासाठी करत आहेत.
अंगणवाडी सेविकांना विविध प्रकारची कामे करावी लागतात. विविध माहिती मोबाईलमध्ये भरावी लागते. यासाठी शासनाने त्यांना मोबाईल दिलेला. पण, मोबाईलवर योग्य काम होत नसणे, हँग होणे, नादुरुस्त होणे अशा अनेक कारणांमुळे राज्यात अनेक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी ते परत केले. सातारा जिल्ह्यातही महिला व बालविकास विभागाकडे मोबाईल परत देण्यात येणार होते. यासाठी संघटनेने जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाला निवेदन दिले होते. मात्र, विभागाकडे एकही मोबाईल जमा झालेला नाही. तसेच शासनाच्या मोबाईलवरून काम करणेही सेविकांनी थांबविले आहे.
..............................
जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या ४८१०
अंगणवाडी सेविका ३८१३
मोबाईल केला परत ०००
......................................
कोट :
अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलबद्दल तक्रारी होत्या. याबाबत संघटनांशी चर्चा केली. तसेच ४१८ मोबाईल नादुरुस्त आढळले. आयुक्त कार्यालयाशी चर्चा करून पत्रव्यवहार करण्यात आला. त्यामुळे ५० मोबाईल नवीन मिळाले आहेत. त्याचे वाटप करणार आहे. नवीन आणखी मोबाईल देण्यावर विचार सुरू आहे. सेविकांचा आमच्याकडे एकही मोबाईल जमा नाही.
- रोहिणी ढवळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग
..........................
शासनाने अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिलेला. पण, त्यामध्ये डाटा कमी असणे, रेंजअभावी न चालणे, बिघाड होणे यामुळे मोबाईल परत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, संबंधितांनी तो घेण्यास नकार दिला. तरीही सेविकांनी शासन मोबाईलचा वापर टाळला आहे. आवश्यक काही काम असेल, तर स्वत:च्या मोबाईलचा वापर केला जातो, असे अंगणवाडी संघटनांच्यावतीने सांगण्यात आले.
...................................................