अंगणवाड्यांना टाळा कायम, मुलांना शिकवणं अन् आहार वाटप बंद...

By नितीन काळेल | Published: December 5, 2023 07:35 PM2023-12-05T19:35:29+5:302023-12-05T19:35:43+5:30

दुसऱ्यादिवशाही संप : मागण्यांवर चर्चा नाही

Anganwadis closed today also, stoped teaching children and distributing food | अंगणवाड्यांना टाळा कायम, मुलांना शिकवणं अन् आहार वाटप बंद...

अंगणवाड्यांना टाळा कायम, मुलांना शिकवणं अन् आहार वाटप बंद...

सातारा: अंगणवाडी सेविकांना महिना २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार रुपये मानधन द्या, कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी बेमुदत संप सुरू केला आहे. याला आता दोन दिवस झाले तरीही शासनाकडून मागण्यांवर चर्चा नसल्याने अंगणवाड्यांचा टाळा निघालाच नाही. तसेच मुलांना शिकवणं आणि आहार वाटपही बंद झालं आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबर वारंवार आंदोलने करण्यात आली. पण, चर्चा आणि आश्वासनाशिवाय त्यांना काही मिळाले नाही. त्यामुळे आता सोमवारपासून संप सुरू करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. तर पहिल्याच दिवशी जिल्ह्यात विविध संघटनांनी आंदोलन करुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये शेकडोच्या संख्येत सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या. तर मंगळवारीही संपाचा परिणाम दिसून आला.

दरम्यान, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे वैधानिक असून त्यांना मिळणारा मोबदला वेतनच आहे. त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करुन त्या अनुषंगाने वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा. मानधन वाढलेतरी महागाई दुपटीने वाढते. यासाठी महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी. कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रस्ताव तयार करुन तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा. महानगर पालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करुन अंगणवाड्यांसाठी ५ हजार ते ८ हजार भाडे मंजूर करावे. आहाराचा ८ रुपये हा दर अत्यल्प आहे. त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याएेवजी वाढत चालले आहे. यासाठी हा दर सर्वसाधारण बालकासाठी १६ आणि अतिकुपोषित बालकासाठी २४ रुपये करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी संप सुरु करण्यात आलेला आहे.

अंगणवाडी बंद; मुलं घरी...

सातारा जिल्ह्यात अंगणवाड्यांची संख्या साडे चार हजारांवर आहे. यामध्ये मोठ्या आणि मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. मोठ्या अंगणवाडीत सेविका आणि मदतनीस ही दोन पदे असतात. तर मिनीला सेविकाच कार्यरत असते. या संपात सुमारे ७ हजार सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या आहेत. यामुळे ४ हजारांवर अंगणवाड्या बंद आहेत. परिणामी दररोज अंगणवाडीत येणारी हजारो मुले घरी आहेत. त्यांना शिक्षण मिळत नाही. तसेच सेविका आणि मदतनीस संपात असल्याने आहार वाटपही बंद झालं आहे.
 

Web Title: Anganwadis closed today also, stoped teaching children and distributing food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.