किलबिलाट सुरू! अंगणवाडीचा टाळा खोलला, वर्गमित्र भेटला अन् पोराचा चेहरा खुलला
By नितीन काळेल | Published: February 2, 2024 05:18 PM2024-02-02T17:18:16+5:302024-02-02T17:20:27+5:30
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील चार हजार अंगणवाड्या होत्या बंद
सातारा : अंगणवाडी सेविकांना महिना २६ हजार आणि मदतनिसांना २० हजार मानधन द्या, कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी ४ डिसेंबरपासून सुरू केलेला संप मागे घेण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील चार हजारांवर अंगणवाड्यांचा टाळा निघाला असून ५३ दिवसांनंतर किलबिलाट सुरू झाला आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत वारंवार आंदोलने करण्यात आली. पण, चर्चा आणि आश्वासनाशिवाय त्यांना काही मिळाले नाही. त्यामुळे ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी संप सुरू करण्यात आला होता. यामध्ये जवळपास सर्वच अंगणवाडी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. या संप काळात जिल्ह्यात विविध संघटनांनी आंदोलन करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये शेकडोंच्या संख्येने सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे ही वैधानिक असून त्यांना मिळणारा मोबदला वेतनच आहे. त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा. मानधन वाढलेतरी महागाई दुपटीने वाढते. त्यामुळे मानधन कमीच पडते. यासाठी महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी. कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रस्ताव तयार करून तो मंजूर करावा, महानगर पालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करुन अंगणवाड्यांसाठी ५ हजार ते ८ हजार भाडे मंजूर करावे.
आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प आहे. त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी वाढत चालले आहे. यासाठी हा दर सर्वसाधारण बालकासाठी १६ आणि अतिकुपोषित बालकासाठी २४ रुपये करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी संप सुरू करण्यात आलेला. यामुळे बालकांचे शिक्षण थांबले होते. तसेच पोषण आहाराचे कामही ठप्प झालेले. यानंतर शासनाने संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवली. त्यानंतर संघटनांनी संप मागे घेतला. त्यामुळे तब्बल ५३ दिवसांनंतर अंगणवाड्या सुरू झाल्या. तसेच मुलांचा किलबिलाटही पुन्हा ऐकू येऊ लागला आहे.
जिल्ह्यात ७ हजार सेविका, मदतनीस आंदोलनात सहभागी
सातारा जिल्ह्यात अंगणवाड्यांची संख्या साडेचार हजारांवर आहे. यामध्ये मोठ्या आणि मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. मोठ्या अंगणवाडीत सेविका आणि मदतनीस ही दोन पदे असतात. तर मिनीला सेविकाचे पद असते. या संपात सुमारे ७ हजार सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या. यामुळे ४ हजारांवर अंगणवाड्या बंद ठेवण्यात आलेल्या.
५० हजार बालके घरी..
सर्व्हेप्रमाणे जिल्ह्यात ३ ते ६ वयोगटातील बालकांची संख्या ७३ हजार २२९ आहे. त्यामधील अंगणवाडीत पटनोंदणी झालेली ६१ हजार ८८३ बालके आहेत. जिल्ह्यात ४ हजार ५६० अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यातील ४ हजार २३१ अंगणवाड्यांना संपामुळे टाळा लागला होता. त्यामुळे ३०० हून अधिक अंगणवाड्याच सुरू होत्या. अंगणवाड्या बंद असल्याने ५० हजारांहून अधिक मुले घरी होती.