चारा छावणीतही आता सुरू होणार अंगणवाड्या! कुटुंबीयांच्या संगतीतच गमभन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 09:44 PM2019-02-11T21:44:50+5:302019-02-11T21:46:21+5:30
दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी शेतकरी धडपडत असून अनेक कुटुंबे सध्या चारा छावणीच्या आश्रयाला येत आहेत. त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने
नितीन काळेल।
सातारा : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी शेतकरी धडपडत असून अनेक कुटुंबे सध्या चारा छावणीच्या आश्रयाला येत आहेत. त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने छावणीतच अंगणवाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुटुंबीयांबरोबर छावणीत वास्तव्यास आलेल्या मुलांना शिक्षणाचे धडे मिळणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, फलटण आदी तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता गेल्या चार महिन्यांपासून जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने आवश्यक तेथे चारा छावण्या व टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.माण तालुक्यातील म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून एक चारा छावणी सुरू झाली आहे. तेथे सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील हजारो जनावरे आली आहेत. अनेक शेतकरी व कुटुंबीयांनीही छावणीतच आश्रय घेतला आहे. या ठिकाणी कुटुंबीयांबरोबरच लहान मुलेही आश्रयाला आली आहेत. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून जिल्हा परिषदेने अंगणवाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्ह्यात चारा छावणी सुरू होईल, तेथे आवश्यकता वाटल्यास अंगणवाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे कुटुंबीयांच्या जवळच या मुलांना शिक्षण व आहार मिळणार आहे. यासाठी जवळपासच्याच अंगणवाडी सेविका व मदतनीसांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
छावणीत पाच वर्षांपर्यंतची ३७ मुले
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी म्हसवडच्या चारा छावणीला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी कुटुंबातील लहान मुले शाळेत जातात का, असा प्रश्न केला. छावणीमुळे मुले येथेच असतात, असे सांगण्यात आले. त्यानंतर डॉ. शिंदे यांनी शिक्षण विभागाला छावणीत किती मुले आहेत, याचे सर्वेक्षण करण्याची सूचना केली. शिक्षण विभागाने केलेल्या या सर्वेक्षणात म्हसवडच्या छावणीत पाच वर्षांपर्यंतची ३७ मुले आढळली. त्यानंतर डॉ. शिंदे यांनी म्हसवडच्या छावणीत अंगणवाडी सुरू करण्याची सूचना संबंधितांना केली.