कपड्यावरील घोषणांतून प्रकटला प्रशासनाचा राग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 10:42 PM2017-11-12T22:42:09+5:302017-11-12T22:44:07+5:30
फलटण : साखरवाडी-खामगावच्या सरहद्दीवर काळूबाईनगरमध्ये वर्षापासून अस्वच्छतेचे साम्राज्य... ग्रामस्थ बाळू भाग्यवंत यांनी ग्रामपंचायत, आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकाºयांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला... पण दखल शून्य. दुर्देवाने ग्रामस्थांबरोबर भाग्यवंत यांच्या मुलालाच डेंग्यू झाला. यामुळे निराश पित्याने स्वत:च्या शर्टावर घोषवाक्य लिहून जनजागृती करण्याबरोबरच प्रशासनाचा निषेधही नोंदविला.
याबाबत माहिती अशी की, गावातील अस्वच्छतेबाबत बाळू भाग्यवंत यांनी वर्षभरापासून गावातील गंभीर परिस्थिती प्रशासनाच्या संबंधित अधिकाºयांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी समक्ष भेटून अर्ज, विनंत्या केल्या; परंतु अधिकारी दाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर काळूबाईनगर परिसरातील घाणीच्या व साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी विविध प्रकारचे फलक लावले. या परिस्थितीकडे ग्रामस्थ, स्थानिक नेतृत्व आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्याला यश आले नाही.
अखेर ही सर्व वस्तुस्थिती मांडणारा एक फलकच त्याने तयार केला असून, तो पाठीवर बांधून खामगाव व साखरवाडी या गावांतून सायकल फेरीद्वारे अगळ्या-वेगळ्या पद्धतीने शासन यंत्रणेचा निषेध करीत ‘धन्य ती लोकशाही’ असे या फलकावर नमूद केले आहे.
बाळू भाग्यवंत यांचे काळूबाईनगर येथे इस्त्रीचा व्यवसाय असून, तेथेच त्यांचे वास्तव्य आहे. घराशेजारी एक गुंठा क्षेत्रात पाण्याचे तळे साठले असून, अनेक ठिकाणांहून तेथे पाणी जमा होते. या गटाराच्या बाजूने त्यांनी टीकात्मक परंतु अत्यंत कल्पकतेने फलक लावून जनजागृतीचा प्रयत्न केला.
स्वच्छतेचा परिणाम व्हायचा तोच झाला. तालुक्यात डेंग्यूची साथ पसरली अन् ती काळूबाईनगरपर्यंत फोफावली. बाळू भाग्यवंत यांच्या मुलाप्रमाणेच या भागात सुमारे अठरा लोक डेंग्यूने आजारी असल्याचे सांगण्यात येते.
यामुळे निराश झालेले भाग्यवंत यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडेही फॅक्सद्वारे हे अर्ज पाठविण्यात आल्याचे सांगून इतके अर्ज पाठविले. समक्ष भेटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आता माझ्या मुलालाच डेंग्यू झाला आहे. ‘धन्य खामगाव ग्रामपंचायत आणि धन्य लोकशाही,’ असे या फलकावर नमूद केले आहे. या आंदोलनानं आता तरी प्रशासन जागे होऊन उपाययोजना करते का? याकडे लक्ष लागले आहे.
पत्रांची जंत्रीच
या फलकावर बाळू भाग्यवंत यांनी गटार तुंबून एक वर्ष झाले. प्रचंड घाण साठली आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी तोंडी सांगून व तक्रार अर्ज करून आपण थकलो असल्याचे नमूद केले आहे.
खामगाव ग्रामपंचायतीकडे
२० जून २०१७
गटविकास अधिकारी १० आॅक्टोबर, १० नोव्हेंबर
तालुका आरोग्य अधिकारी १० आॅक्टोबर व १० नोव्हेंबर
अर्ज देऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केल्याचे या फलकावर नमूद करण्यात आले आहे.