शरणागती पत्करून पक्षांतर करणाऱ्यांची जनतेला कीव : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 05:21 PM2019-08-29T17:21:43+5:302019-08-29T17:26:07+5:30
महाराष्ट्रातील सर्व लोक पवार यांना सोडून जाणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव करतात. शरणागती पत्करून पक्षांतर करणाऱ्यांच्या विरोधी महाराष्ट्रात एक लाट निर्माण होऊ लागली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
कऱ्हाड : नेते गेले म्हणजे राष्ट्रवादीची पिछेहाट होते, हा गैरसमज पहिल्यांदा काढला पाहिजे. कार्यकर्ते आहे तिथेच आहेत, जनताही आहे तिथेच आहे. उलट अशा पक्षांतराची उबक सामान्य माणसांना महाराष्ट्रात येते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखे क्रियाशील व्यक्ती आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व लोक पवार यांना सोडून जाणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव करतात. शरणागती पत्करून पक्षांतर करणाऱ्यांच्या विरोधी महाराष्ट्रात एक लाट निर्माण होऊ लागली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी कऱ्हाडात दाखल झाली. प्रीतिसंगम येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी सर्व पदाधिकाऱ्यांनी जाऊन अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मानसिंगराव जगदाळे, राजेंद्र पाटील-उंडाळकर, नगरसेवक सौरभ पाटील उपस्थित होते.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, बेरोजगारी नोकरी असे अनेक प्रश्न समाजापुढे आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. या अवस्थेत भाजप व शिवसेनेने पाच वर्षांत जनतेचा अपेक्षाभंग केलेला आहे. या गोष्टीचा विचार त्यांनी करावा. भाजपची जनादेश यात्रा ज्या ठिकाणी जाईल तेथील विरोधी पक्षातील प्रमुख नेते, सर्वसामान्य जनतेला स्थानबद्ध केले जात आहे.
मुख्यमंत्र्यांना आपल्याच राज्यात फिरण्याची भीती वाटत आहे. ही भीती म्हणजे त्यांच्या मागील पाच वर्षांच्या कारभाराचे द्योतक म्हणावे लागेल. ज्यांना राज्यात सुरक्षितता वाटत असेल त्यांनी एक लक्षात घ्यावी की सध्या खूप भीषण परिस्थिती आहे. आज ते जात्यात आहेत, उद्या नक्कीच सुपात असतील.
राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा कऱ्हाडला येण्यापूर्वी तळबीड येथील स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळी गेली. त्या ठिकाणी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. त्यानंतर ही यात्रा कऱ्हाड येथील दत्त चौकात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांनी अभिवादन केले.
उदयनराजे पवारांना विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाहीत
राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खासदार उदयनराजे भोसलेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे उदयनराजे भोसले जर पक्षांतर करणार असतील तर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अगोदर सांगतील. त्यांना सांगितल्याशिवाय पक्ष बदलणार नाहीत, असे शिवस्वराज्य यात्रेवेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.