टेंभूचे पाणी मिळणार नाही म्हणणाऱ्या आमदारांकडून नौटंकी -: अनिल देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 08:14 PM2019-06-19T20:14:24+5:302019-06-19T20:16:50+5:30
‘टेंभूचे पाणी माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळी गावांना मिळविण्यासाठी डॉ. दिलीप येळगावकर आणि मी तब्बल १६ वर्षे संघर्ष केला. सुदैवाने आमच्या मागणीनुसार राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने हे पाणी मिळाले आहे.
सातारा : ‘टेंभूचे पाणी माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळी गावांना मिळविण्यासाठी डॉ. दिलीप येळगावकर आणि मी तब्बल १६ वर्षे संघर्ष केला. सुदैवाने आमच्या मागणीनुसार राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने हे पाणी मिळाले आहे. हे पाणीच काय पण बुडबुडाही मिळणार नाही, असं म्हणणारे माणचे आमदार आता नौटंकी करत पाण्याची मागणी करत आहे,’ अशी खरपूस टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केली.
सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देसाई म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून मिरवणाºया माणच्या आमदारांनी गेल्या नऊ वर्षांत एकदाही टेंभूचे पाणी मागण्याचं शहाणपण दाखवलं नाही. आता भाजप सरकारच्या प्रयत्नामुळे टेंभूचं पाणी मिळाल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी आ. गोरे यांचा खटाटोप सुरू आहे.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून माणच्या पूर्व भागात टेंभू योजनेचे पिण्यासाठी पाणी आणण्यात यश आले आहे. आता उत्तर माणला जिहे-कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावच्या पाणी प्रश्नासाठी मी आणि माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचा पाठपुरावा सुरू आहे,’ असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
देसाई म्हणाले, ‘टेंभू योजनेतून माण-खटावला पाणी मिळावे, यासाठी २००३ पासून सलग १६ वर्षे माणच्या जनतेला बरोबर घेऊन मोर्चे, आंदोलने करून संघर्ष केला. डॉ. दिलीप येळगावकर यांनीही कित्येक वर्षे टेंभूमधून माण- खटावला पाणी मिळावे, यासाठी संघर्ष केला. उच्च न्यायालयात याबाबत याचिकाही त्यांनी दाखल केली होती. आमच्या या लढ्याला राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून यश मिळायला सुरुवात झाली. टेंभूमधून आज माणच्या १६ गावांना पिण्यासाठी पाणी मिळाले असून, महाबळेश्वरवाडी तलाव भरण्याचे काम सुरू आहे. लवकरच खटाव तालुक्यातील मायणी तलावही भरण्यात येणार आहे. वास्तविक टेंभूचे पाणी माण - खटावला मिळावे, ही मागणी आम्ही १६ वर्षांपासून करत आहोत. या मागणीला यशही येत आहे. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांकडून आता ही मागणी नव्याने करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देसाई यांनी केला.