प्रबोधनासह लोकसहभागाने प्राण्यांचे अधिवास सुरक्षित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:03 AM2021-01-08T06:03:10+5:302021-01-08T06:03:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वनक्षेत्रात वणवा लावणं कायदेशीर गुन्हा आहे याचं प्रबोधन आणि लोकसहभागातून जाळरेषा काढण्याची मोहीम घेतल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : वनक्षेत्रात वणवा लावणं कायदेशीर गुन्हा आहे याचं प्रबोधन आणि लोकसहभागातून जाळरेषा काढण्याची मोहीम घेतल्याने वणव्याच्या घटना कमी झाल्या. गतवर्षात जिल्ह्यात २१ गुन्ह्यांमध्ये ३५ आरोपींना पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.
वनक्षेत्रासह खासगी जागेत गवत चांगलं यावं या उद्देशाने वणवा लावण्यात येत होता. ग्रामीण भागात याचे प्रमाण सर्वाधिक होते. गेल्या काही वर्षांत वनविभागाच्यावतीने जाळरेषा काढण्याबरोबरच वणवा न लावण्यासाठी प्रबोधन केले जात होते. वनहद्दीलगत खासगी जागेत असणाऱ्या बांधावरील गवत पेटवून देताना अनेकदा वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होते. यामुळे जंगलात असणाऱ्या अमूल्य वनस्पती, वृक्ष तसेच वन्यप्राण्यांसह त्यांचा अधिवासही जळून खाक होत होता.
सातारा जिल्ह्यात मेढा आणि पाटण विभागात ४, फलटणला १, वाई ९ आणि साताऱ्यात ३ वणव्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी मेढ्यात आणि साताऱ्यात ४, तर पाटणला १५, फलटणला १ आणि वाईला ११ आरोपी पकडण्यात आले.
चौकट :
‘लोकमत इनिशिएटिव्ह’चाही वाटा मोठा
गतवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला वनसंपदेबरोबरच वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्यासाठी वनविभागाच्या साथीने ‘लोकमत’ने वणवामुक्तीची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत पाचशेहून अधिक सातारकरांनी प्रत्यक्ष श्रमदान करून जाळरेषा काढली होती. जानेवारीमध्ये सुरू झालेली ही मोहीम तब्बल साठ दिवस चालली. यामुळे सामान्यांमध्ये वणवा लावणे हा गुन्हा असून वनसंपदा जोपासणे आणि वन्यप्राण्यांना जपणे हे आपले कर्तव्य असल्याचे अधोरेखित झाले. परिणामी, वणवा लावण्याचे प्रमाण अटोक्यात आले.
कोट
वणवा लावणे गुन्हा आहे, याची माहिती ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. याबरोबरच ‘लोकमत’ने अजिंक्यतारा परिसर वणवामुक्त करण्यासाठी जाळरेषा काढण्यासाठी घेतलेल्या इनिशिएटिव्हमुळे सामान्यांमध्ये याविषयी जागरुकता निर्माण झाली आहे.
- डॉ. भारतसिंह हाडा, उपवनंसरक्षक अधिकारी, सातारा