जंगलातील प्राणीही प्लास्टिकमुक्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:20 PM2018-07-22T23:20:03+5:302018-07-22T23:20:07+5:30

Animals in the forest await plastics | जंगलातील प्राणीही प्लास्टिकमुक्तीच्या प्रतीक्षेत

जंगलातील प्राणीही प्लास्टिकमुक्तीच्या प्रतीक्षेत

Next


खंडाळा : शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाने शहरी भागासह ग्रामीण भागातील प्लास्टिक कचरा कमी होऊ लागला असला तरी मानवाने केलेल्या अतिवापरामुळे तो शहरे सोडून जंगलापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्याचा त्रास प्राण्यांनाही होत आहे. जंगली प्राणीही प्लास्टिक मुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जंगलात प्लास्टिक निर्मूलनाची चळवळ उभी राहणे गरजेचे असून, पर्यटकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
मानवी आरोग्याच्यादृष्टीने प्लास्टिक कचरा घातक ठरत आहे. त्यामुळे यापासून मुक्तता मिळावी, यासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाने शहरी भागासह ग्रामीण भागातही प्लास्टिक वापरावर मर्यादा आल्या; पण अगोदरपासूनच मानवाच्या कृत्यामुळे प्लास्टिकचे लोन जंगलापर्यंत पोहोचले होते. वास्तविक जंगलात पडलेल्या प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, खाऊचे कागद, जेवणाचे डबे, प्लास्टिक कागद या सर्वांमुळे जंगलातील प्राणी, पक्ष्यांना त्याचा त्रास होत असतो. अनेकदा हे प्राणी खाद्याच्या शोधार्थ या पिशव्यांच्या मोहात पडतात. त्यामुळे त्यांच्याकडून ते खाल्ले जाते. पक्षी जमिनीवरील खाद्य टिपताना हे प्लास्टिकचे तुकडे त्यांच्या पोटात जातात. सजीवांच्या जीविताला धोका निर्माण होतो.
जंगलातील सफरीसाठी किंवा ट्रेकिंगसाठी तसेच निसर्गरम्य ठिकाणी सहलींसाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पर्यटनाला जाताना आवश्यक वस्तू सोबत नेण्यासाठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. परंतु या वस्तूंचा वापर झाल्यानंतर हा सर्व कचरा जंगलातच फेकला जातो. त्यामुळे निसर्गरम्य परिसरसुद्धा प्रदूषित होत आहे. शहरी आणि ग्रामीण भागासह जंगल परिसरातही स्वच्छता मोहीम राबवून जंगली जीवांची या जीवघेण्या समस्येतून सुटका करणे गरजेचे आहे.
या गोष्टी पाळा
पर्यटनाला जाताना कापडी पिशव्यांचा वापर करावा
जेवणाचे प्लास्टिक पॅकिंग डबे, खाऊचे कागद पर्यटनावरून येताना परत घेऊन यावेत
जंगल भागात धूम्रपान करू नये
पर्यटन करतेवेळी प्लास्टिक कचरा आढळल्यास तो एकत्र गोळा करून घेऊन यावा

Web Title: Animals in the forest await plastics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.