६१ लाख रुपयात मोजणार आता जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:29 AM2020-02-06T00:29:34+5:302020-02-06T00:33:36+5:30
राज्यभरासह सातारा जिल्ह्यात पशु प्रगणकामार्फत पशुपक्षी व पाळीव प्राण्यांची पशुगणना फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आली. पशुसंवर्धन विभागाकडून या प्रगणकांचे मानधन तब्बल एक वर्षाने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. प्रगणकांनी केलेल्या आंदोलनाला यामुळे एकप्रकारे यश आले आहे.
योगेश घोडके ।
सातारा : जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ३१० प्रगणकांकडून पशुसंवर्धन विभागाने २० वी पशुगणना करून घेतली. यामध्ये प्रगणकांनी जेवढ्या कुटुंबांची नोंद केली, त्याप्रमाणे त्यांना रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे ३१० प्रगणकांच्या खात्यावर ६१ लाख ७५ हजार ६४५ रुपये जमा झाले आहेत.
राज्यभरासह सातारा जिल्ह्यात पशु प्रगणकामार्फत पशुपक्षी व पाळीव प्राण्यांची पशुगणना फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आली. पशुसंवर्धन विभागाकडून या प्रगणकांचे मानधन तब्बल एक वर्षाने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. प्रगणकांनी केलेल्या आंदोलनाला यामुळे एकप्रकारे यश आले आहे.
राज्यात प्रत्येक पाच वर्षांनी पाळीव प्राणी व पशुपक्ष्यांची गणना केली जाते. या गणनेनंतर पशुपक्ष्यांची आकडेवारी वाढली की घटली, त्या दृष्टीने शासनस्तरावर उपाययोजना केल्या जातात. २० वी गणना २०१९ मध्ये पशुप्रगणकांमार्फत राज्यभर करण्यात आली. पशुगणनेच्या प्रगणकांना क्षेत्रीय कामाचे मानधन देण्यासाठी केंद्र शासनाने १९ व्या पशुगणनेप्रमाणे विहित प्रमाणात मानधन दिले आहे. त्या अनुषंगाने नागरी विभागात प्रतिकुटुंब ६ रुपये १५ पैसे तर ग्रामीण विभागात ७ रुपये ५० पैसे आणि डोंगरी दुर्गम व अतिदुर्गम विभागात ९ रुपये असे मानधन ठरवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अकरा तालुक्यात पशुप्रगणकांनी केलेल्या कामाची खात्री करूनच मानधन वाटप करण्याबाबत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनेनुसार पशुप्रगणकांना त्याचप्रमाणे मानधनाची अंमलबजावणी करण्यात आली.
या पशुप्रगणकांना राज्य शासनाच्या माध्यमातून ३२० टॅब देण्यात आले. या टॅबमध्ये अॅप असून, यामध्ये प्रश्नावलीच्या स्वरुपात माहिती भरण्यात आली. या अॅपमध्ये जनावरे व त्या कुटुंबाची माहिती भरण्यात आली. जिल्ह्यात ६० निरीक्षक, ३१० प्रगणक, ११ स्कूटीन अधिकारी नेमले होते. त्यांच्या माध्यमातून पशुगणना करण्यात आली आहे.
दर पाच वर्षांनी होतेय पशुगणना..
पशुगणना दर पाच वर्षांनी होते. मात्र, २० वी पशुगणना ही तांत्रिक दृष्टीने करण्यात आली; पण अधिकृत जाहीर केलेली नाही. जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे. यात ३१० प्रगणकांनी सहभाग घेऊन ही पशुगणना केली आहे.
१९ वी पशुगणना
पशु एकूण संख्या
गाय ३७, ७, २६२
म्हैस ३५, २, ८४४
शेळी ३०, ९, ०११
मेंढी २६, ४, २२१
कुक्कुट पक्षी ३९, ७९, ६११
कुत्री ६४,२७४
डुक्कर ६६१
गाढवे १५५८
घोडे १९३९
जिल्ह्यातील पशु व प्राण्यांची पशुगणना फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आली. या कामाचे पैस आम्हाला २०२० मध्ये देण्यात आले. आम्ही केलेल्या कामाचे पैसे मिळविण्यासाठी वारंवार आंदोलन केली आहेत. या आंदोलनाला २०२० मध्ये यश आले, असेच म्हणावे लागले.
- जालिंदर भुसे, प्रगणक, पाटण
जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील पशु व प्राण्यांची पशुगणना तांत्रिकदृष्ट्या पूर्ण झाली आहे; पण केंद्र सरकार लवकरच कागदोपत्री पशुगणना या महिन्यात जाहीर करणार आहे. तसेच जिल्ह्यातील ३१० पशुप्रगणकांच्या खात्यात ६१ लाख ७५ हजार ६४५ रुपये जमा झाले आहेत.
-डॉ. अंकु श परिहार, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन सातारा